News Flash

१२ वीच्या बनावट प्रश्नपत्रिका विकणाऱ्या दुकलीला पुण्यात अटक

बारावीची बोर्डाची परीक्षा तोंडावर आलेली असताना विज्ञान आणि गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका विकणाऱ्या दोन मुलांना पुणे पोलिसांच्या दरोडा पथकाने सापळा रचून मंगळवारी अटक केली. मात्र, बारावीच्या

| January 30, 2013 10:23 am

बारावीची बोर्डाची परीक्षा तोंडावर आलेली असताना विज्ञान आणि गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका विकणाऱ्या दोन मुलांना पुणे पोलिसांच्या दरोडा पथकाने सापळा रचून मंगळवारी अटक केली. मात्र, बारावीच्या प्रश्नपत्रिका फुटण्याची कोणतीही शक्यता नसून विकण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिका बनावट असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी सांगितले.
या प्रकरणी सुरेश खेगे (वय २०) आणि रमेश शर्मा (वय २२, दोघेही रा. लातूर) यांना अटक करण्यात आली आहे. खेगे व शर्मा दोघेही बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विकण्यासाठी लातूरहून पुण्याला येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलिस निरीक्षक सतीश गोवेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीच्या सांगवी येथील काटेपुरम चौकामध्ये पोलिसांना सापळा रचला. त्या वेळी खेगे व शर्मा एका मुलाला कागदपत्रे दाखवत असताना त्यांचा संशय आल्यामुळे पोलिसांनी छापा घालून अटक केली. या दोघांकडे असलेल्या प्रश्नपत्रिका ताब्यात घेण्यात आल्या आहेत. बारावीच्या विज्ञान शाखेच्या गणित व विज्ञान विषयाच्या बनावट प्रश्नपत्रिका तयार करून त्यांची विक्री करण्यात येणार होती. आठ प्रश्नपत्रिकांच्या संचाचाठी सोळा हजार रुपयांना प्रश्नपत्रिका विकण्यात येणार होत्या अशी माहिती खेगे व शर्मा यांनी पोलिसांना दिली.
प्रश्नपत्रिका फुटलेल्या नाहीत
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी सांगितले, ‘‘एका विषयाच्या अनेक प्रश्नपत्रिका तयार केल्या जातात. त्यापैकी नेमकी कोणती प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे, ते अत्यंत गोपनीय असते. बारावीच्या कोणत्याही विषयाच्या प्रश्नपत्रिका अजून छापलेल्या नाहीत. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटण्याची कोणत्याही प्रकारे शक्यता नाही.’’
अफवांवर विसंबू नका
कोणीही प्रश्नपत्रिका विकत असेल अगर त्याची अफवा पसरवत असेल, तर त्यावर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून आणि बोर्डाकडून करण्यात आले आहे. प्रश्नपत्रिका विकल्या जात असल्याची माहिती मिळाल्यास (०२०)२६१२२८८० अथवा २६११२२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2013 10:23 am

Web Title: arrest to two who are saleing the duplicate question papers of hsc exam
टॅग : Hsc
Next Stories
1 एलएलएम अभ्यासक्रम आता वर्षभराचा
2 अनुदानित ‘बीपीएड’ प्राध्यापकांमध्ये असंतोष
3 हरवलेले शिक्षकत्व गवसण्यासाठी..
Just Now!
X