वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांची ‘गणित’ या विषयाशी गट्टी जुळविण्याच्या दृष्टीने ‘नवनिर्मिती’तर्फे शिक्षकांसाठी ‘सक्रिय जनगणित’ ही तीन दिवसांची कार्यशाळा ९ ते ११ जून दरम्यान पुण्यात घेण्यात येणार आहे.
या कार्यशाळेत मुलांना संकल्पना समजावी यासाठी बोटे, कृती, वस्तू अशा परिचित भाषेत ‘गणित’ करणे आणि संकल्पनेची ही समज अंकचिन्हांच्या भाषेत मांडायला शिकणे या दोन टप्प्यांवर मार्गदर्शन केले जाईल. ‘मी ऐकले की ते विसरतं, मी पाहिलं की ते लक्षात राहतं, मी स्वत: केलं की ते समजतं’ या चिनी म्हणीवर या पद्धती अवलंबून आहेत. गणिताचे सार्वत्रिकीकरण शक्य आहे, हे या कार्यक्रमात सहभागी झालेल्या शिक्षकांनी सिद्ध करून दाखविले आहे. यात जिल्हा परिषद शाळा, आदिवासी आश्रमशाळा, नगरपरिषदांच्या शाळा, तसेच एसएससी, आयसीएसई, सीबीएसई, आयबी अशा सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांच्या शिक्षकांचा समावेश आहे.
पुण्यात नवनिर्मिती लर्निग फाऊंडेशन येथे सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत ही कार्यशाळा होईल. कार्यशाळेत इयत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमावर काम होईल. कार्यशाळा ‘करा व शिका’ या पद्धतीने होईल. रायपूरमधील विश्व वेदान्त या शाळेचे शिक्षक यात सहभागी होणार असल्याने कार्यशाळा हिंदी-इंग्रजीतून होईल. समजून गणित शिकविण्याची तत्त्वे, समजण्यासाठी ‘करण्याची’ गरज, दोन टप्प्यांची सक्रिय जनगणित पद्धत, एक अंकी संख्या, दोन व तीन अंकी संख्या, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णाक, दशांक अपूर्णाक, समजून भूमिती हे या कार्यशाळेत शिकविले जाईल.
अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क – नवनिर्मिती लर्निग फाऊंडेशन, गुणवत्ता, ५६४ ब/२ शनिवार पेठ, रमणबाग चौक, पुणे- ४११०३०. दूरध्वनी – ०२०-२४४७१०४०.