News Flash

उपमा

भारतीय घरातला फारच परिचित होऊन बसलेला नाश्ता एवढंच उपम्याचं अस्तित्व नाही.

आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ आणि मूळ शोधायचा प्रयत्न.

दोन गोष्टींचा परस्परांशी संबंध नसतानादेखील त्या आपल्याला आठवतात. मग एकाच नावाच्या दोन भिन्न गोष्टी आठवल्या तर त्यात नवल नाही. शाळेत उपमा अलंकार शिकताना नाश्त्यातला उपमा आठवणं आणि उपमा खाताना ‘प्रेमाला उपमा नाही’चा विनोद होणं हे खूप सहज आहे. भारतीय घरातला फारच परिचित होऊन बसलेला नाश्ता एवढंच उपम्याचं अस्तित्व नाही. घरात एखादी व्यक्ती आजारी आहे, ‘उपमाच द्या त्याला’ असे काळजीपूर्ण सल्ले मिळणार. डब्यात काय देऊ लेकराला अशी समस्या आहे, तर उपमा देऊ का? ही विचारणा होणार. प्रवासात बरा पडतो म्हणून शिऱ्यासोबत उपम्याचा विचार होणार. झटकन पटकन व पौष्टिक या सगळ्या अपेक्षा तो पूर्ण करतो. तरीही उपमा आवडणारे, नावडणारे आणि दुसरा फारसा बरा पर्याय नाही म्हणून उपमा खाणारे असे वेगवेगळे वर्ग आपल्या आसपास असतात.

उपमा नेमका कधीपासून आपल्या आहाराचा भाग बनला हे ठामपणे सांगता येत नाही, पण तांदळाच्या किंवा गव्हाच्या रव्याला आपल्या पूर्वजांनी फार आधीपासून आहारात पसंती दिली असावी. गुप्तकाळात शिजवलेला रवा व दही यापासून बनवलेले  दधिसक्तू नाश्त्याचा भाग होता. रव्याचा पौष्टिकपणा निर्वविाद असला तरी रव्याची पेज, खीर वा त्याचं नुसतंच शिजवलेलं रूप आजारकळा आणतं हे एखाद्या चाणाक्ष पूर्वजाने वेळीच ओळखलं आणि मग त्यात छान तिखट चवदार भर टाकत उपमा निर्माण केला असावा.

उपमा अलंकार शिकताना खाद्यपदार्थाला हे नाव का दिलं असावं याचं कुतूहल वाटतं, पण या नावाचं दक्षिणेशी नातं आहे. याच दाक्षिणात्य भाषेच्या प्रभावातून उपमा शब्द निर्माण झाला आहे. द्राविड भाषेत ‘उप्पू’ म्हणजे मीठ तर ‘मावू’ किंवा ‘हिट्ट’ म्हणजे पीठ. उप्पमावू किंवा उप्पीटू हा मूळ शब्द होता. त्यातून उप्पीट, उपमा, उप्पींडी असे विविध शब्द निर्माण झाले. कन्नडमध्ये हाच उपमा खाराभात होतो. तेलगूमध्ये उिप्पडी होतो आणि कोकणी भाषेत रूलांव होतो. नावं वेगळी असली तरी पदार्थ मात्र तोच आहे.

उपम्याची पाककृती अगदी सहज आहे. त्या सहजपणामुळे हा उपमा खूप वेळा आपल्या नाश्त्याचा भाग होतो. या खूपपणामुळे काहींचा त्याच्यातला रस कमी होतो. रेडी टू कुक हे त्याचं नवं रूप ही आणखी एक सोय. ‘मी आज उपमा खाल्ला’ हे स्टाइल स्टेटमेंट होऊ शकत नाही. पाश्चात्त्यांना मात्र या सिंपल बट टेस्टी ब्रेकफस्टचं आकर्षण वाटतं. वर्ष २०११ मध्ये याच उपम्याने भारतीय घरातला शेफ फ्लॉईड कारडोझला एक लाख डॉलर्सचं धनी केलं. न्यूयॉर्कमधील एका कुकिंग स्पध्रेत मुंबईकर फ्लॉईडसमोर फूडमेमरीवर आधारीत एखादा पदार्थ बनवण्याचं आव्हान होतं. अशा वेळी फार कलाकुसरीचा पदार्थ न निवडता फ्लॉईडने चक्क आपल्या घरगुती उपम्याची निवड केली आणि हा साधासा, पटकन तयार होणारा पण पौष्टिक पदार्थ परीक्षक मंडळींना भावला. उपम्याने फ्लॉईडला जिंकवून दिलं.

आज लांब पल्ल्याच्या ट्रेनमधल्या साध्या उपम्यापासून लग्नाच्या केटरिंगमधल्या मटारवाल्या उपम्यापर्यंत आणि टिपिकल मराठमोळ्या उपाहारगृहातील शेवेची पखरण घेऊन येणाऱ्या उपम्यापासून घरातल्या घरात गाजर, फ्लॉवर, वाटाणा, टोमॅटो, काजू, बदाम काय मिळेल ते वापरून सजवलेल्या उपम्यापर्यंत जबरदस्त व्हरायटी आपण सर्वानीच चाखलेली असते. हे त्याचं स्र्ील्ल open for all, everywhere with anyone असणंच जाम भारीय. काही पदार्थाना त्यांच्यावर चर्चासत्रं झडावीत असं भाग्य लाभतं. तर काही पदार्थ सगळ्या गरजा पूर्ण करूनही अप्रसिद्धच राहतात. उपमा हा दुर्दैवाने दुसऱ्या वर्गात मोडतो. ऑफिसमध्ये खूप मन लावून काम करणारा, सगळ्यांची मदत करणारा कारकून असतो, पण चुकार माणसंच विनाकारण चच्रेत राहतात. या गुणी, कामसू कारकुनासारखा उपमा वाटतो. कुणी काहीही म्हणा, कौतुक करा अथवा नका करू, पण कांदा, टोमॅटो आणि कसल्या कसल्या पदार्थाची फौज सोबत घेऊन गरमागरम वाफेवर स्वार होऊन आपली सकाळची भरपेट नाश्त्याची गरज पूर्ण करण्यासाठी your service तो नेहमीच तत्पर असतो. त्याच्या या गुणी स्वभावाला खरंच ‘उपमा’ नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 1:04 am

Web Title: article by rashmi warang on upma
Next Stories
1 च्युइंगम
2 चिक्की
3 कचोरी
Just Now!
X