कोल्हापूर : राज्यातील सर्वात मोठ्या गोकुळ दूध संघासाठी रविवारी अत्यंत चुरशीने मतदान झाले. मात्र  हे मतदान होताना करोना नियमावलीचा संपूर्णपणे फज्जा उडत दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी करोना संसर्ग फैलावत असतानाही प्रचाराचा धुरळा उडाला होता.  जिल्ह्यातील ७० मतदान केंद्रावर मतदान पार पडले.  मात्र हे करताना सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही गटांनी आपआपल्या ताब्यात असलेल्या मतदारांना एकगठ्ठा सोबत आणत शक्तिप्रदर्शन केले. सत्ताधारी गटाकडून हे सर्व मतदार आणि त्यांचे कार्यकर्ते पांढऱ्या टोप्या घालून तर विरोधी गटाचे सर्व मतदार आणि कार्यकर्ते हे पिवळ्या टोप्या परिधान करत मतदान केंद्रांवर आले. हे शेकडो मतदार येताना त्याला शक्तिप्रदर्शनाचेच स्वरूप आले होते. या गर्दीमुळे करोना नियमांचा संपूर्णपणे फज्जा उडाला होता.