||दयानंद लिपारे
सहकार क्षेत्रातील महत्त्वाची संस्था अडचणीत
कोल्हापूर : गैरव्यवहार, अपहार, गटातटाचे राजकारण त्यामुळे एकेकाळी आशिया खंडात प्रतिष्ठा मिळवलेल्या कोल्हापुरातील ‘शेतकरी संघा’ची धूळधाण उडाली आहे. काही संचालक अपात्र; काहींचे राजीनामा सत्र यामुळे संचालक मंडळाचे अस्तित्व मावळतीला लागले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी मोठा लौकिक मिळवला आहे. त्यामध्ये शेतकरी संघाचा समावेश करावा लागेल. महानगरांमध्ये मॉल संस्कृतीने हातपाय पसरले आहेत. पण हेच तत्त्व कोल्हापूर शहरात ४० च्या दशकात सुरू झाले ते शेतकरी संघाच्या माध्यमातून. २३ ऑक्टोंबर १९३९ ही शेतकरी संघाच्या स्थापनेची तारीख.

शेतमालाची खरेदी योग्य भावात करून दलालांकडून होणारी पिळवणूक थांबवली. ग्राहकांना रास्त दराने घरगुती वस्तू उपलब्ध होऊ लागल्या. विविध प्रकारचे धान्य, गूळ, तंबाखू, मिरची, हळद आदी व्यवहारातून संघाचा लौकिक उत्तरोत्तर वाढत गेला. सभासद संख्या ४३ हजारांवर पोहोचली. रावसाहेब पीए राणे, वकील तोडकर, तात्यासाहेब मोहिते, बाबा नेसरीकर यासारख्या नेक लोकांमुळे संघाची गुणवत्ता आणि ‘बैल’ ही नाममुद्रा अढळस्थानी पोहचली. दर्जा आणि रास्त किंमत याचा मिलाफ असल्यामुळे सणांच्या वेळी खरेदीसाठी रांगा लागलेल्या असत.

 अस्तित्वासाठी संघर्ष

सन २०१५-१६ मध्ये १९ जणांचे संचालक मंडळ अस्तित्वात आले.  सुरुवातीला चांगला कारभार चालला. संघाला नफाही मिळाला. पण, व्यापारी वृत्तीने आलेल्या काही संचालकांनी संधी मिळेल तेथे हात मारण्यास सुरुवात केली. अपहाराची मालिका सुरू झाली.

शिरोळ शाखेतील ३७ लाखांच्या अपहार प्रकरणी शाखाधिकारी, निरीक्षक यांच्यावर ठपका ठेवला गेला. संघाचा कारभार हितकारक होण्याला बगल देऊन व्यवहारातून प्रसाद कसा मटकावता येईल ते सुचवत राहिले. अर्थलोभी संचालक याच्याच शोधात होते.

त्यातून संघाचा कारभार गाळात रुतला. ६५ पैकी ३७ शाखा मध्ये अपहार झाल्याचा प्रकार होऊनही सारे काही आलबेल असल्याचा दाखवण्याचा प्रकार झाला. जिल्हा मध्यवर्ती बँकेत कर्ज घेतले असतानाही शेतकरी संघातून घेतलेले पैसे परत करताना व्याज देण्यास नकार दर्शविला. अशा भ्रष्ट प्रवृत्तीला कंटाळून आम्ही संचालकांनी राजीनामा दिला आहे,’ असे संचालक व्यंकाप्पा भोसले यांनी सांगितले. ज्येष्ठ संचालक शिवाजीराव कदम, विजयादेवी राणे, मानसिंगराव जाधव यांनी प्रशासक नियुक्तीची मागणी केली आहे. शेतकरी संघाच्या हिताविरोधी भूमिका घेतली जात आहे. बहुमताच्या बळावर चुकीचे निर्णय घेतले गेले. तक्रारीला दाद न दिल्याने राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. संघाच्या लक्ष्मीपुरी, राजारामपुरी येथील मोक्याच्या जागा आर्थिक गैरव्यवहार करून विकल्या. गूळ, खत, पेट्रोल विभागात उधारी दिली गेली. शिरोळ शाखेत ४० लाखांचा अपहार होवूनही त्याच कर्मचाऱ्यांना कामावर घेतले. नोकरभरतीत आर्थिक गैरव्यवहार झाला, असे अनेक मुद्दे या तिघांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

सहकार नियमावलीच्या ८० कलमाखाली संघाची चौकशी सुरू झाली आहे. अशातच, पाच संचालकांचे निधन, दोघेजण अपात्र ठरले, दोन संचालक सभेला फिरकतच नाहीत तर भ्रष्ट कारभारामुळे उर्वरित संचालकांनी राजीनामा दिले आहेत. आता केवळ आठ संचालक उरले आहेत.

अधिकारी – पदाधिकारी संगनमत

काळ बदलला तसे संस्थेत येणाऱ्या संचालकांची प्रवृत्ती बदलली. शेतकरी संघाचा राजकीय अड्डा बनला. समर्थकांची राजकीय सोय लावण्याची प्रयत्न झाले. भ्रष्ट अधिकाऱ्यांची- कर्मचाऱ्यांची साथ मिळाली. अधिकारी-पदाधिकारी यांच्या संगनमतामुळे संघाचा कारभार भ्रष्टाचारात रुतत राहिला.