पुरवठा तातडीने सुरळीत करावा – सतेज पाटील

कोल्हापूर : कर्नाटकातून दक्षिण महाराष्ट्रातील पाच जिल्ह्य़ांना होणाऱ्या प्राणवायूच्या पुरवठय़ात अचानकपणे अनियमितपणा आल्याने या जिल्ह्य़ातील प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. या पुरवठय़ाअभावी काही गंभीर घटना टाळण्यासाठी तो कर्नाटक सरकारने तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी केंद्र शासनाकडे केली आहे.

कर्नाटकातून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यला प्राणवायूचा पुरवठा होतो. बेल्लारी येथून या भागाला प्राणवायू  पुरवला जातो. तेथून कोल्हापुरात प्राणवायू आल्यानंतर त्यातील दहा टन प्राणवायू गोव्याला पाठवला जातो. मात्र गेल्या दोन दिवसांपासून या पुरवठय़ात मोठा अनियमितपणा आल्याने आरोग्य व्यवस्थेसोबतच प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली आहे.

याबाबत आज पालकमंत्री सतेज पाटील यांनी कर्नाटकातून  पश्चिम महाराष्ट्राला पूर्ववत प्राणवायूचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. तसेच कोल्हापुरातून गोव्याला प्राणवायू पुरवठा करण्याऐवजी तो थेट बेल्लारी येथून केला जावा असे त्यांनी सूचित केले आहे. प्राणवायू, रेमडेसिविर इंजेक्शन पुरवण्याचा निर्णय केंद्र शासन घेते. त्यामुळे कर्नाटकातून पष्टिद्धr(१५५)म महाराष्ट्र, कोकणाला पुरेशा प्रमाणात प्राणवायू मिळावा अशी मागणी त्यांनी केंद्र शासनाकडे केली आहे. सायंकाळपर्यंत प्राणवायू पुरवठा सुरळीत होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र शासन राजकारण करत असल्याच्या मुद्दय़ाचा त्यांनी इन्कार केला. जोपर्यंत केंद्र शासनाकडून याबाबतचा निश्चित प्रतिसाद मिळत नाही तोवर राजकीय भाष्य करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.