कोल्हापूर : पुलाची शिरोली येथे काल रात्री तरुणांच्या टोळक्याने गावातील अन्य तरुणांवर  दहशत गाजवण्याचा प्रयत्न केला. नंग्या तलवारी,  लोखंडी गज घेऊन आलेल्या टोळक्याने दुसऱ्या गटाला आव्हान दिले. प्रत्युत्तरादाखल दुसरा गटही लाठय़ाकाठय़ा घेऊन सरसावल्याने सदर प्रसंग ओढवला.

गावकऱ्यांनी दोन्ही गटाला शांत केल्याने स्थिती नियंत्रणात आली तरी पोलिसांनी धुडगूस घालणाऱ्यांचा माग ठेवला. मंगळवारी धुळवड असल्याने पुन्हा वाद होऊ नये यासाठी गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

शिरोली हायस्कूलजवळील काही तरुण सोमवारी सायंकाळी पंचगंगा नदीत पोहण्यासाठी जात होते. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत जय हिंद हॉटेलसमोर शिरोलीतील कबड्डी खेळाडू असलेल्या पाच ते सहा तरुणांनी मोटरसायकल आडव्या लावल्या.

यातील तरुणानेआपण मी शिरोली गावातील डॉन आहे असे आव्हान देत  मोटर सायकल पुढे नेऊन दाखवा, असे ललकारले. प्रतिष्ठित व्यक्तीने वादावर पडदा पाडला.

रात्री साडेसातच्या सुमारास कबड्डी खेळाडू असलेल्या सुमारे २० तरुणांच्या टोळक्याने तलवार व लोखंडी गज घेऊन गावात दहशत सुरु केली. प्रत्युत्तरादाखल दुसऱ्या गटातील तरुणही काठय़ा व गज घेऊन रस्त्यावर उभे ठाकल्याने संघर्ष निर्माण झाला.

पुन्हा एकदा जबाबदार व्यक्ती पुढे आल्याने त्यांनी समजूत काढली. शिरोली पोलिसांना दहशत माजवणाऱ्या तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.