कोल्हापूर : छगन भुजबळ यांना राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण करायची आहे, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी येथे केला. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना आवरावे ,अशी मागणीही पाटील यांनी केली. मराठा समाजाच्या आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. या अंतर्गत शुक्रवारी रात्री येथील दसरा चौकात जाहीर सभा झाली. सभेपूर्वी मनोज जरांगे पाटील यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यांनी राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. त्यानंतर सभास्थळी त्यांनी मराठा आरक्षण प्रश्नी भाषण केले. मंचावर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, संभाजी राजे छत्रपती होते. दसरा चौकात झालेल्या या सभेला मराठा समाजाने तुफान गर्दी केली होती.

आज ओबीसी समाजाच्या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती . त्याला या सभेत जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर देत समाचार घेतला. मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळू लागल्याने एकाचा तर आणखी तीळपापड झाला आहे. माझ्या जातीच्या आड कोण येत असेल, तर त्याला सोडणार नाही. लोकांचे रक्त पिऊन संपत्ती मिळवली म्हणून तुम्हाला तुरुंगात जावे लागले. मुख्यमंत्री होणे हा यांचा छुपा अजेंडा आहे. ते जर मुख्यमंत्री झाले तर आमचे आरक्षण गेलेच म्हणून समजावे, अशी भीती पाटील यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यात बैठक; वाढता शासकीय हस्तक्षेप, मागास जातींच्या हक्कांवरील परिणामांवर चर्चा

आमचे फलक लागले आहेत. तुमचेही फलक लागतील. पण आम्हाला शांत राहू द्या, असे म्हणत त्यांनी आणखी एक इशारा दिला. मला कायदा सुव्यवस्था सांभाळायची असल्याने शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. याही पुढे शांततेतच आंदोलन करायचे आहे. हे दोन्ही राजेंच्या साक्षीने सांगतो. साधे शेताचा बांधावर जरी हक्क सांगितला तरी आम्ही दोन पिढ्या बोलत नाही. आणि आमच्या आरक्षणाला कोणी धक्का लावणार असेल तर स्वस्थ कसे बसू? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर एकेरी भाषेत बोचरी टीका, म्हणाले, “तुझ्यासारखं मी सासऱ्याच्या घरी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठा समाजाला आरक्षण मिळणार हे त्यांना समजून चुकले आहे. ते कोणत्याही पातळीवर जाऊन विरोध करणार आहेत. पण आपण त्यांना किंमत द्यायची नाही. आपल्या लढ्यामध्ये राजकारण आणू न देता एकजूट ठेवावी. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच, असा पुनरुच्चार त्यांनी केला. मराठा समाजाच्या आज लाखांनी नोंदी सापडत आहे. पुरावे असतानाही ते दडपून का ठेवले याचे उत्तर मिळाले पाहिजे. यापूर्वीच आरक्षण मिळाले असते तर आज जगात प्रगत मराठा अशी ओळख निर्माण झाली असती, असे मत जरांगे पाटील यांनी सभेत व्यक्त केले.