कोल्हापूर : गारपीट, अवकाळीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या नुकसानीचे मोजमाप करण्यासाठी यंदापासून उपग्रह प्रतिमा वापरल्या जाणार आहेत. यासाठी राज्य शासनातर्फे उपग्रहाशी जोडलेल्या ‘सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक’ (नॉर्मलाइज्ड डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स) या अद्यायावत तंत्रज्ञान प्रणालीचा वापर केला जाणार आहे.
यामुळे गारपीट, अवकाळीसारख्या आपत्तीवेळी पारंपरिक पंचनाम्यांच्या जोडीला या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पिकांचे नेमके नुकसान ठरवणे आणि ही प्रक्रिया गतीने राबवणे शक्य होणार आहे. हा प्रयोग सध्या राज्यातील प्रत्येक महसूल विभागातील एका जिल्ह्यात राबवला जाणार आहे. या प्रकल्पासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
नवीन तंत्रज्ञान काय?
‘सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक’ हे एक उपग्रह नियंत्रण तंत्रज्ञान आहे. याद्वारे संबंधित भागातील छायाचित्रणाद्वारे पीक वाढ, अडचणी, नुकसान याची माहिती संकलित केली जाईल.
काम कसे चालेल?
पिकांच्या स्थितीबाबत मिळणारी माहिती जिल्हा, तालुका व शेत पातळीवर संकलित केली जाईल. याआधारे शेतकऱ्यांना सल्ला देण्यासाठी एक ‘मोबाइल अॅप’ही विकसित केले जाणार आहे.