कोल्हापूर : ऊसदरासाठीची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सोमवारची पहिली बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतकरी संघटनांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी हा प्रश्न आणखी तापवण्याची भूमिका घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात निर्णय न झाल्यास पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे गुरुवारी होणाऱ्या बैठकीनंतर आंदोलनाची आक्रमक दिशा निश्चित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

यावर्षीचा ऊस गळीत हंगाम सुरू झाला असला तरी त्यामध्ये पावसाचा अडसर आहे. शेतामध्ये ओल असल्याने ऊसतोडीला मर्यादा आल्या आहेत. दुसरीकडे ऊसदरावरून सर्वपक्षीय शेतकरी संघटनांनी संघर्षाची भूमिका घेतलेली आहे.

गेल्या हंगामात कारखान्यांना साखर विक्री, इथेनॉल, सहवीज निर्मिती अशा विविध उपउत्पादनातून चांगले उत्पन्न मिळालेले आहे. त्यामुळे गेल्या हंगामातील ऊस गाळपासाठी आणखी प्रतिटन २० रुपये व यावर्षीच्या हंगामासाठी एफआरपी (रास्त व उचित दर) पेक्षा अधिक रक्कम म्हणजे प्रतिटन ३७५१ रुपये मिळावेत यासाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे.

ऊसदर आंदोलन भडकले

आंदोलन सुरू असताना शिरोळमधील आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांना कारखाना समर्थकांकडून मारहाण झाली. परिणामी शिरोळ, कुरुंदवाड या शहरांसह ग्रामीण भागात दोन दिवस बंद पाळण्यात आला. काल शिरोळ तहसील कार्यालयावर आयोजित केलेल्या मोर्चावेळी राजू शेट्टी, धनाजी चुडमुंगे, माजी आमदार उल्हास पाटील यांनी साखर कारखानदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली.

तर त्याआधी एकनाथ शिंदे शिवसेना, भाजप शेतकरी आघाडी, शरद जोशी यांची शेतकरी संघटना, जय शिवराय शेतकरी संघटना यांच्यासह आठ शेतकरी संघटनांनी साखर सहसंचालक कार्यालयावर निदर्शने करून ६ नोव्हेंबरपासून कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला. जिल्ह्याच्या करवीर, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, कागल या तालुक्यात ऊस वाहतूक रोखण्यात आली आहे. काही भागांमध्ये ऊस वाहतूक करणारी वाहने पेटवून देण्यात आल्याने ऊसदर आंदोलनाला काही प्रमाणात आवश्यक वळण लागू लागले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे लक्ष

या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सोमवारी शेतकरी संघटना व साखर कारखानदारांची बैठक आयोजित केली होती. नेहमीप्रमाणे पहिल्या बैठकीला साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनी दांडी मारली. कार्यकारी संचालकांना पुढे करण्यात आले. पण त्यांनी मांडलेली भूमिका शेतकरी संघटनांना अमान्य होती. साखर कारखान्याच्या अध्यक्षांच्या अनुपस्थितीवरून शेतकरी संघटनांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. या बैठकीत अपेक्षेप्रमाणे कोणताही तोडगा निघाला नाही.

कारखानदारांची चिंता वाढली

यामुळे आता पुढील आंदोलनाचे टप्पे ठरविण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री हे कोल्हापुरात उद्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार आहेत. त्यांचे उसाचे कांडे देऊन कोल्हापुरात स्वागत करण्यात येणार असल्याचा निर्णय गेल्या आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जाहीर केला आहे.

अर्थात, मुख्यमंत्री आणि आंदोलकांची भेट होण्याची शक्यता कठीणच दिसते. तथापि कोल्हापुरात आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस ऊसदराबाबत कोणती भूमिका घेतात यावर आंदोलनाची दिशा ठरणार आहे. याही पातळीवर निर्णय न झाल्यास गुरुवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गुरुवारी (६ नोव्हेंबर) शेतकरी संघटनांसमवेत बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे या बैठकीत कोणता तोडगा निघतो याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. याही बैठकीत निर्णय झाल्यास ऊसदराचे आंदोलन आणखी तापण्याची चिन्हे आहेत. ऊस तोडी रोखल्याने आणि कारखान्यांना पुरेसा ऊसपुरवठा होत नसल्याने साखर कारखानदारांची चिंता मात्र वाढलेली आहे.