दयानंद लिपारे, लोकसत्ता
कोल्हापूर : कोल्हापुरातील दंगलसदृश वातावरणामुळे इंटरनेट सेवा बंद ठेवल्यामुळे गुरुवारी मोबाइल आणि इंटरनेटद्वारे होणारे कोटय़वधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. बँका, औद्योगिक-व्यापारी संस्था, शैक्षणिक संस्थांना फटका बसला. अनेकांनी तातडीच्या ‘ई – बँकिंग’ व्यवहारांसाठी सीमेलगतच्या कर्नाटकातील गावांसह सांगली जिल्ह्यात जाण्याचा पयार्य निवडला.
कोल्हापूर शहरामध्ये समाज माध्यमांवरील आक्षेपार्ह मजकुरावरून मोठे आंदोलन झाले. तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने बुधवारी मध्यरात्रीपासून इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय तातडीने अमलात आणला.
इंटरनेट सेवा बंद झाल्यामुळे डिजिटल बँकिंग, डेबिट, क्रेडिट, मोबाईल वॉलेट ही अर्थविश्वातील दुनिया पूर्णत: ठप्प होती. यूपीआय पेमेंटद्वारे होणारे व्यवहारही बंद होते. ई – बँकिंग सेवेवरही परिणाम झाला. ग्राहकांना त्याचा त्रास सोसावा लागला, असे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठय़ा सहकारी कल्लाप्पाण्णा आवाडे बहुराज्य शेडय़ुल्ड बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे यांनी सांगितले. ई-मेल, वैद्यकीय सेवा, प्रशासकीय सेवा, रेल्वे, विमान सेवा यांच्या आरक्षणावरही विपरित परिणाम झाला. खासगी आस्थापनांनाही अडचणींना तोंड द्यावे लागले.
कर्नाटक, सांगलीकडे धाव..
कर्नाटक हद्दीतील गावांमध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये मात्र इंटरनेट सेवा सुरू होती. याची माहिती मिळताच ज्यांना तातडी होती अशांनी अवघ्या पाच, दहा किलोमीटरवर असलेल्या या गावांमध्ये प्रवेश केला मोबाईल बँकिंग पासून ऑनलाईन मीटिंग, ई-मेल, समाज माध्यमांवर मजकूर अग्रेषित करण्याची कामे उरकली. मात्र त्यांनी पाठवलेला मजकूर कोल्हापुरातील समाज माध्यमावर दिसत नसल्याने त्यांना खट्टू व्हावे लागले.