नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सविरुद्ध हाणामारीच्या षटकांत दिलेल्या १८ अतिरिक्त धावा दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवास कारणीभूत ठरल्या. आता मधल्या फळीतील फलंदाजांनी अधिक आक्रमकपणे फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे, असे मत दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनी सांगितले.

‘‘आता घरच्या मैदानांवरही विजय मिळवण्याची गरज भासू लागली आहे. घरच्या मैदानावरील गेल्या दोन सामन्यांत आम्ही चांगला खेळ करू शकलो नाही. डावाच्या मध्यात धावगती वाढवण्यावर आम्हाला भर द्यावा लागणार आहे, त्यामुळे त्यावेळी एका आक्रमक फलंदाजाला पाठवण्याचा आमचा विचार असेल,’’ असेही अमरे यांनी सांगितले.

दिल्लीतील धीम्या गतीच्या खेळपट्टय़ा फलंदाजांसाठी कितपत पोषक आहेत, असे विचारल्यावर अमरे म्हणाले, ‘‘वानखेडे स्टेडियमवर चेंडूला उसळी मिळत असताना आम्ही २००पेक्षा अधिक धावा फटकावल्या. फिरोजशाह कोटलाच्या खेळपट्टीची आम्हाला चांगली जाण आहे, मात्र या खेळपट्टीशी जुळवून घेणे अत्यंत गरजेचे आहे. शिखर धवन ज्याप्रकारे खेळपट्टीचा रागरंग ओळखून फलंदाजी करतो, त्यानुसार त्याला मधल्या फळीतील फलंदाजांची साथ मिळणेही आवश्यक आहे.’’

फिरकीपटू अमित मिश्राला संधी देण्याचा निर्णय कितपत योग्य होता, या प्रश्नावर अमरे यांनी सांगितले की, ‘‘संघनिवडीत सातत्य राखण्याची आमची इच्छा आहे. हाणामारीच्या अखेरच्या षटकांमध्ये इशांत शर्मा चांगली गोलंदाजी करत असून तोच संघ कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील.’’