काही माणसे एखाद्या खेळासाठी आयुष्यभर स्वत:ला झोकून देतात, तरीही त्यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय किंबहुना राष्ट्रीय पातळीवरसुद्धा फारशी दखल घेतली जात नाही. मुंबईतील दादर परिसरात राहणारे रमेश वरळीकर हे त्यांच्यापैकीच एक. थोरला भाऊ प्रभाकरच्या प्रेरणेने रमेश यांनी प्रज्वलित केलेली खो-खोच्या प्रगतीची मशाल अखेरच्या श्वासापर्यंत तेजाने जळत राहिली. खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि सांख्यिकीतज्ज्ञ अशा विविध भूमिका त्यांनी बदलत्या काळानुसार निभावल्या. त्यामुळे रमेश यांचे नाव नेहमीच आदराने घेतले जाईल.

दादरच्या पिंटो व्हिला हायस्कूलमधून (आता नाबर गुरुजी विद्यालय) शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या रमेश यांची घरची आर्थिक परिस्थिती तशी उत्तम होती. रुपारेल महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी खो-खोकडे अधिक लक्ष केंद्रित केले. मुख्य म्हणजे आई अथवा वडील यांच्यापैकी कोणीही क्रीडा क्षेत्राशी फारसे संबंधित नसताना वरळीकर कुटुंबीयांच्या चारही मुलांनी मात्र खो-खोमध्ये कारकीर्द घडवण्याचे शिवधनुष्य उचलले. प्रभाकर आणि रमेश यांनी लोकसेना संघाचा दर्जा वेगळ्याच उंचीवर नेला, तर विजयकुमार आणि नंदकुमार हे लहान भाऊ अनुक्रमे विद्युत क्रीडा मंडळ आणि वैभव क्लब येथे खो-खोचे प्रशिक्षण द्यायचे.

खो-खो खेळ ही एक कला आहे, त्यामुळे आपल्या कलेशी प्रामाणिक राहून अखेपर्यंत ती कला जोपासा, असे वरळीकर नेहमी सांगायचे. त्यांनी स्वत:ही कधी त्यांचा शब्द खाली पडू दिला नाही. खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यानंतरही वरळीकरांनी न थांबता अनेक उत्तमोत्तम खेळाडू घडवले. डॉ. हेमा नरवणकर, प्रतिभा गोखले, रेखा राय, दिनेश परब यांसारखे खेळाडू त्यांनी महाराष्ट्राला दिले. त्याशिवाय मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे पदाधिकारी म्हणूनही आपले कार्य चोखपणे केले.

१९७०मध्ये जेव्हा त्यांनी खो-खोच्या सामन्यांची आकडेवारी गोळा करण्यास सुरुवात केली, तेव्हा माझी वरळीकर यांच्याशी घनिष्ठ मैत्री झाली. प्रत्येक सामन्यात एखादा खेळाडू किती मिनिटे धावला अथवा एखाद्या खेळाडूने किती गडी बाद केले, हे त्यांना इत्थंभूत लक्षात राहायचे. त्यांच्या आग्रहास्तव मग जिल्हा आणि राज्यपातळीवरील स्पर्धाना संघाबरोबर किमान एक सांख्यिकीतज्ज्ञ जाण्यास सुरुवात झाली. मग महाराष्ट्र खो-खो संघटनेनेसुद्धा त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्पर्धाना १२ खेळाडू आणि २ सांख्यिकीतज्ज्ञ असा संच पाठवण्यास परवानगी दिली. त्या वेळी माझ्यासह मनोहर साळवी, सुधीर इनामदार हे वरळीकर यांच्या पाठीशी राहिले.

वरळीकर यांच्या लेखणीत खो-खोसंबंधित आकडय़ांची वेगळीच गंमत असे. त्यामुळेच ‘लोकसत्ता’सह आघाडीच्या मराठी वृत्तपत्रांमध्ये त्यांचे जवळपास ३००हून अधिक लेख प्रकाशित झाले. त्याचप्रमाणे खो-खोच्या नोंदणीपासून अनेक बाबींशी निगडित त्यांनी १४ पुस्तके लिहिली. खो-खोची कोणतीही स्पर्धा असली तरी ते वृद्धापकाळातही एका लहान मुलाप्रमाणे तितक्याच उत्साहाने मैदानावर हजर असायचे. त्यांच्यामुळेच आमच्यासारख्यांनाही प्रेरणा मिळायची.

अमर हिंद मंडळासाठीही त्यांनी दिलेले योगदान नेहमीच स्मरणात राहील. परंतु आता त्यांचा वारसा कोणीतरी पुढे चालवण्याची गरज आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धासाठी सांख्यिकीतज्ज्ञांची अधिक गरज भासते. त्यामुळे भारतीय खो-खो महासंघाने यामध्ये बारकाईने लक्ष घालावे. ८३ वर्षांच्या आयुष्यातील जवळपास ७० वर्षे खो-खो खेळासाठी वाहणाऱ्या एका अवलियाला यापेक्षा मोठी आदरांजली असू शकत नाही, असे मला वाटते.

खो-खो या खेळातही आकडय़ांची मजा निर्माण करून असंख्य क्रीडाप्रेमींच्या मनात घर करणारे ज्येष्ठ सांख्यिकीतज्ज्ञ रमेश वरळीकर यांचे गुरुवारी निधन झाले. खेळाडू म्हणून छाप पाडल्यानंतर प्रशिक्षक म्हणूनही अनेक राष्ट्रीय पातळीवरचे खो-खोपटू घडवण्यात वरळीकरांनी मोलाची भूमिका बजावली. समाजमाध्यमांचे फारसे अस्तित्वही नसताना त्यांनी लेखणीच्या माध्यमातून खो-खोला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवले. ‘खो-खोचा चालता-बोलता इतिहास’ असे बिरूद मिरवणाऱ्या वरळीकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा खो-खो संघटक आणि अमर हिंद मंडळाचे कार्याध्यक्ष अरुण देशपांडे यांनी घेतलेला वेध..

(शब्दांकन – ऋषिकेश बामणे)