ऋषिकेश बामणे

क्रिकेट म्हणजे जीव की प्राण मानल्या जाणाऱ्या आपल्या भारत देशात लोकप्रिय क्रिकेटपटूंना डोक्यावर उचलून आयुष्यभर त्यांचे गोडवे गाण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे, परंतु यादरम्यान काही असे खेळाडूही घडतात, ज्यांना ठरावीक काळासाठीच का होईना, पण या ताऱ्यांनी सजलेल्या बेटावर चमकण्याची संधी मिळते. युसूफ पठाण आणि आर. विनय कुमार हे त्यापैकीच एकमेकांच्या अगदी विरुद्ध दिशेतील दोन ध्रुव.

धडाकेबाज फलंदाजीसह उपयुक्त अष्टपैलू योगदानासाठी ओळखला जाणारा ३८ वर्षीय युसूफ आणि ‘दावणगिरी एक्स्प्रेस’ नावाने प्रसिद्ध असलेला वेगवान गोलंदाज विनय या दोघांनीही २७ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीयसह सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. युसूफला २००७ च्या ट्वेन्टी—२० आणि २०११च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी लाभली. स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्याने छाप पाडणाऱ्या ३७ वर्षीय विनयच्या वाटय़ाला मात्र फक्त ४१ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आला.

दक्षिण आफ्रिकेत झालेल्या २००७च्या ट्वेन्टी—२० विश्वचषकात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी वीरेंद्र सेहवागला दुखापत झाली आणि नव्या दमाच्या युसूफवर सलामीची जबाबदारी सोपवण्यात आली. बडोद्याच्या युसूफने ही संधी साधून आक्रमक सुरुवात करताना विश्व स्तरावर आपले पदार्पण झाल्याचे जाहीर केले. युसूफचा लहान भाऊ इरफान त्या लढतीत सामनावीर ठरला. त्या वेळी इरफान एकीकडे सर्वोत्तम लयीत असताना युसूफ मात्र संघातील स्थान टिकवून धरण्यात अपयशी ठरत होता, परंतु प्रत्यक्षात मैदानावर मात्र दोन्ही भावंडांमध्ये कधीही स्पर्धा जाणवली नाही.

२००८च्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्सने युसूफला संघात स्थान दिले आणि हाच क्षण त्याच्या कारकीर्दीला कलाटणी देणारा ठरला. कोणाच्या खिजगणतीतही नसलेल्या शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील राजस्थानने चक्क जेतेपद पटकावले आणि युसूफच त्या जेतेपदाचा खऱ्या अर्थाने शिल्पकार ठरला. पाकिस्तानविरुद्ध २००८ मध्ये एकदिवसीय कारकीर्दीला प्रारंभ करणाऱ्या युसूफने पुढे २००९ आणि २०१०च्या ट्वेन्टी—२० विश्वचषकातसुद्धा भारताचे प्रतिनिधित्व केले. न्यूझीलंडविरुद्ध ३१६ धावांचा पाठलाग करताना ९६ चेंडूंत नाबाद १२३ धावांची साकारलेली विजयी खेळी, मुंबई इंडियन्सविरुद्ध अवघ्या ३७ चेंडूंत झळकावलेले शतक, यांसारखे मोजके क्षण क्रीडाचाहत्यांना युसूफची सातत्याने आठवण करून देतील.

युसूफच्या तुलनेत कर्नाटकच्या दावणगिरी शहरात जन्मलेल्या विनयची कारकीर्द मात्र झाकोळली. उपखंडातील खेळपट्टय़ांवर वेगवान गोलंदाज म्हणून नावलौकिक मिळवणे तसे कठीणच, परंतु २००९—१०च्या स्थानिक हंगामात विनयने सर्वाधिक बळी मिळवत भारतीय संघाचे दार ठोठावले. २०१०च्या ट्वेन्टी—२० विश्वचषकात त्याला फारशी छाप पाडता आली नाही. त्याच वर्षी त्याने एकदिवसीय कारकीर्दीलाही प्रारंभ केला, परंतु दुखापती आणि सुमार कामगिरीमुळे त्याला संघातील स्थान टिकवणे जमले नाही. सुदैवाची गोष्ट म्हणजे विनयला किमान २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळण्याचे भाग्य लाभले. २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच विनयने घरच्या प्रेक्षकांसमोर कारकीर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. २०१९ मध्ये विनयने कर्नाटकऐवजी पुदुच्चेरीकडून स्थानिक क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेत त्या संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावण्यात मोलाची भूमिका बजावली.

युसूफ आणि विनय यांच्यातील एक साम्य म्हणजे २०१४ मध्ये ‘आयपीएल’ विजेत्या कोलकाता नाइट रायडर्स संघाचा दोघेही भाग होते. मात्र मैदानावरील कामगिरीमुळे ते समाजमाध्यमांवर अनेकदा चर्चेचा विषयही ठरले. द्रव्य उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याप्रकरणी जानेवारी २०१८ मध्ये युसूफवर पाच महिन्यांची बंदी घालण्यात आली. त्याशिवाय २०१९ मध्ये मुंबईविरुद्धच्या रणजी सामन्यात पंचांनी बाद घोषित केल्यानंतरही युसूफ खेळपट्टीवरच उभा राहिला. पंच तसेच मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेशी शाब्दिक चकमक केल्याने त्याच्या प्रतिमेला काहीसा काळिमा फासला गेला. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटव्यतिरिक्त आयपीएलमध्येही धावांची लयलूट करणाऱ्या विनयला क्रीडाचाहत्यांनी अनेकदा निशाण्यावर घेतले. २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध अखेरच्या षटकात १७ धावांचा बचाव करण्यात विनयला आलेले अपयश, हे त्यांपैकीच एक उदाहरण.

कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात फक्त एका टप्प्यापर्यंत क्रिकेट मर्यादित असते. त्यामुळे निवृत्तीनंतर अथवा निवृत्तीपूर्वीच तो मैदानाबाहेर कसे कार्य करतो, याकडे सगळ्यांचे लक्ष असते. युसूफने इरफानच्या साथीने युवा पिढीला घडवण्यासाठी पठाण क्रिकेट अकादमीची सात वर्षांपूर्वी सुरुवात केली. आज देशातील एकूण २० शहरांमध्ये ही अकादमी कार्यरत आहे. ६ ते २१ वयोगटातील मुला—मुलींना येथे क्रिकेटचे बारकावे शिकवण्यापासून भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांचे मार्गदर्शनही लाभते. त्याशिवाय गतवर्षी करोना साथीच्या पार्श्वभूमीवर बडोद्यात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीदरम्यान युसूफने गरजूंना आर्थिक साहाय्य करण्यासाठी पुढाकार घेतला होता. विनयनेसुद्धा निवृत्तीनंतर प्रशिक्षणाचा पर्याय स्वीकारला असून लवकरच कर्नाटकमध्ये स्वत:चे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा त्याचा मानस आहे. २०१३—१४ आणि २०१४—१५ अशी सलग दोन वर्षे कर्नाटकला आपल्याच नेतृत्वाखाली रणजीचे जेतेपद मिळवून देणाऱ्या विनयकडून भविष्यातील तारे घडलेले पाहणे सगळ्यांनाच आवडेल.

तूर्तास, युसूफ आणि विनय हे दोन्ही माजी खेळाडू सध्या रायपूर येथे सुरू असलेल्या रस्ते सुरक्षा जागतिक क्रिकेट स्पर्धेत भारत लेजंड्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

rushikesh.bamne@expressindia.com