मार्च महिन्यात बांगलादेशातील ढाका शहरात खेळवल्या जाणाऱ्या Asia XI vs World XI टी-२० सामन्याकरता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणाही केली. मात्र बीसीसीआयने अद्यापही भारतीय खेळाडूंच्या नावावर शिक्कामोर्तब केलेलं नाहीये. विराट कोहली आणि त्याच्या सहकाऱ्यांवर असलेला अति-क्रिकेटचा ताण लक्षात घेतल्यानंतरच याबद्दल निर्णय घेतला जाईल असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने विराट कोहली, शिखर धवन, लोकेश राहुल, ऋषभ पंत, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांना Asia XI संघात स्थान दिलं आहे. मात्र या सामन्यात खेळण्यासाठी कर्णधार विराट कोहलीने अद्याप होकार कळवला नसल्याचं बीसीसीआयच्या सुत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. भारतीय संघ न्यूझीलंड दौरा आटपून ६ मार्च तारखेला भारतात परतणार आहे. यानंतर १२ मार्चपासून भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

१२ मार्चरोजी धर्मशाळा येथे पहिला वन-डे सामना खेळवला जाणार आहे. यानंतर १५ तारखेला भारत लखनऊमध्ये दुसरा तर १८ तारखेला कोलकात्यात तिसरा वन-डे सामना खेळेल. भारतीय खेळाडूंचं सध्याचं व्यस्त वेळापत्रक पाहता, फिटनेस टेस्ट केल्यानंतरच भारतीय खेळाडूंच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाईल असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.