ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ख्रिस रॉजर्सने मंगळवारी आपल्या निवृत्तीची औपचारिक घोषणा केली. अ‍ॅशेस मालिकेतील ओव्हल येथे होणारी पाचवी कसोटी ३७ वर्षीय रॉजर्सचा शेवटचा सामना असणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दुखापतग्रस्त झाल्यानंतर रॉजर्सने अ‍ॅशेस मालिकेनंतर निवृत्तीचे संकेत दिले होते. इंग्लंड दौऱ्यात डोक्यावर चेंडू आदळल्याने रॉजर्सला चक्कर जाणवली होती. मात्र तरीही लॉर्ड्स कसोटीत खेळताना त्याने शानदार शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती.
२००८ मध्ये रॉजर्सने भारताविरुद्ध पर्थ कसोटीत पदार्पण केले. त्यानंतर पुन्हा संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला ५ वर्ष प्रतीक्षा करावी लागली. मात्र पस्तिशीनंतरही त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली. २४ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्त्व करताना रॉजर्सने ४२.८६च्या सरासरीने १९७२ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे.