पुरुषांमध्ये जोकोव्हिच, चिलिच तसेच महिला एकेरीत सेरेना, बार्टी तिसऱ्या फेरीत

मेलबर्न : कारकीर्दीतील २१व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या दिशेने कूच करणारा रॉजर फेडरर आणि महिला एकेरीतील गतविजेती नाओमी ओसाका यांनी बुधवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखली. या दोघांव्यतिरिक्त नोव्हाक जोकोव्हिच, मरिन चिलिच, सेरेना विल्यम्स आणि अ‍ॅश्ले बार्टी यांनीसुद्धा तिसऱ्या फेरीतील स्थान पक्के केले.

पुरुषांच्या जागतिक टेनिस क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या स्वित्झर्लंडच्या तृतीय मानांकित फेडररने १ तास आणि ३२ मिनिटे रंगलेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात फिलिप क्राजिनोव्हिचचा ६-१, ६-४, ६-१ असा सरळ तीन सेटमध्ये फडशा पाडला.

सर्बियाच्या गतविजेत्या जोकोव्हिचने जपानच्या तात्सुमा इटोला ६-१, ६-४, ६-२ अशी धूळ चारली. क्रोएशियाच्या चिलिचने २१व्या मानांकित बेनॉट पेरीला साडे तीन रंगलेल्या लढतीत ६-२, ६-७ (६-८), ३-६, ६-१, ७-६ (१०-३) असे पाच सेटमध्ये नमवले. फिलिप कोशीब्रीएरने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे सहाव्या मानांकित स्टिफानोस त्सित्सिपासला पुढील फेरीत चाल देण्यात आली.

महिला एकेरीत जपानच्या तिसऱ्या मानांकित ओसाकाने शेंग साईसाईचा ६-२, ६-४ असा धुव्वा उडवला. तर अमेरिकेच्या १५ वर्षीय कोरी गॉफने सोराना क्रिस्टिआला ४-६, ६-३, ७-५ असे पिछाडीवरून पराभूत केले. तिसऱ्या फेरीत ओसाका आणि गॉफ एकमेकींविरुद्ध उभ्या ठाकतील.

कारकीर्दीतील २४वे ग्रँड स्लॅम पटकावण्यासाठी आतुर असलेल्या ३९ वर्षीय सेरेनाने तमारा झिदानसेकला ६-२, ७-३ असे नेस्तनाबूत केले. तिसऱ्या फेरीत सेरेनासमोर २७व्या मानांकित वांगचे आव्हान असेल. ऑस्ट्रेलियाच्या अग्रमानांकित बार्टीने पोलोना हेकॉगचा ६-१, ६-४ असा पराभव करून पुढील फेरी गाठली.

भारताच्या शरणची आगेकूच; बोपण्णा पराभूत

पुरुष दुहेरीत भारताचा दिविज शरण आणि त्याचा नवा सहकारी अर्टेम सितक यांनी दुसरी फेरी गाठली. मात्र भारताच्याच अनुभवी रोहन बोपण्णा आणि याशुटका युचियामा यांना सलामीलाच गाशा गुंडाळावा लागला. शरणने न्यूझीलंडच्या सितकच्या साथीने पाबलो बुस्टा आणि जुआ सुस्टा यांचा ६-४, ७-५ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. बोपण्णा-युचियामा यांच्या जोडीला अमेरिकेच्या १३व्या मानांकित बॉब आणि माईक ब्रायन यांनी ६-१, ३-६, ६-३ असे पराभूत करून त्यांचे आव्हान संपुष्टात आणले.