वेस्ट इंडिजला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत २-१ ने पराभूत करणाऱ्या इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध मालिकेतही चांगली सुरुवात केली आहे. मँचेस्टर कसोटी सामन्यात इंग्लंडने ३ गडी राखत पाकिस्तानवर मात केली. महत्वाची गोष्ट म्हणजे ४ दिवसांमध्येच या सामन्याचा निकाल लागला. विजयी सुरुवात करणाऱ्या इंग्लंडला उर्वरित सामने संघातील अष्टपैलू बेन स्टोक्सशिवाय खेळावे लागणार आहेत. स्टोक्सने घरगुती कारणांमुळे पाकिस्तानविरुद्ध उर्वरित मालिकेतून माघार घेतली आहे. स्टोक्स न्यूझीलंडला आपल्या पालकांना भेटायला जाणार आहे. त्यामुळे साऊदम्पटनमध्ये खेळवण्यात येणाऱ्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांकरता तो उपलब्ध नसेल.

अवश्य वाचा – इंग्लंडच्या विजयात मोलाची भूमिका बजावूनही बटलर आपल्या कामगिरीवर नाखुश, कारण…

वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत चमकदार कामगिरी केलेल्या बेन स्टोक्सला पाकिस्तानविरुद्ध सामन्यात चांगली कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या डावात स्टोक्स भोपळाही न फोडता माघारी परतला. यानंतर पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात स्टोक्सने गोलंदाजीत कमाल दाखवत दोन बळी घेतले. २७७ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडची दुसऱ्या डावातही घसरगुंडी उडाली होती. स्टोक्स दुसऱ्या डावातही अवघ्या ९ धावा काढून माघारी परतला. बटलर आणि वोक्सच्या शतकी भागीदारीमुळे इंग्लंडने सामन्यात बाजी मारली.

अवश्य वाचा – फाळणीपासून होणारी चूक पाकिस्तानने पुन्हा केली, पहिल्या कसोटी पराभवानंतर शोएब अख्तर भडकला