भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सध्या ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. कोलकाता कसोटी अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश आलं, यानंतर आजपासून नागपूरमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. मात्र भारतीय संघासाठी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेऐवजी आगामी दक्षिण आफ्रिकेची मालिका जास्त खडतर ठरणार, असा अंदाज वर्तवला जात आहे. आफ्रिका दौऱ्याआधी बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन सर्वोतोपरीने संघात नवीन बदल करत नवोदित खेळाडूंना संघात जागा देण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर गोलंदाजीचा अर्धा भार सांभाळणारी रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजा ही फिरकीची जोडगोळी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघात तुम्हाला कदाचित दिसणार नाही. खुद्द कर्णधार विराट कोहलीने यासंदर्भात संकेत दिले आहेत.

दुसरी कसोटी सुरु होण्याआधी विराट कोहलीने नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघनिवडीबद्दल प्रश्न विचारला असता विराट म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर परदेशात खेळताना आम्ही संघात दोन फिरकीपटूंना जागा देऊ याची शाश्वती देता येणार नाही. कारण परदेशात वातावरण आणि खेळपट्टीशी जुळवून घेताना संघाचा समतोल राखला जाणं महत्वाचं असतं. अश्विन आणि जाडेजा हे गोलंदाजीसोबत अखेरच्या फळीत चांगली फलंदाजीही करतात. मात्र समोरचा संघ बघून योग्य त्या वेळी योग्य त्या खेळाडूला अंतिम संघात जागा दिली जाईल.”

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्याआधी घरच्या मैदानावर भारतीय संघाने आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना चारीमुंड्या चीत केलं आहे. घरच्या मैदानावर खेळवल्या गेलेल्या १३ पैकी फक्त १ सामना भारतीय संघाने गमावलेला आहे. या विजयात अश्विन आणि जाडेजा या जोडीचं योगदान महत्वाचं आहे. अश्विनने यंदाच्या हंगामात घरच्या मैदानावर १३ सामन्यांमध्ये ८१ बळी मिळवत माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे. दुसरीकडे जाडेजानेही आपली उपयुक्तता सिद्ध करत कसोटी क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं.

आफ्रिकेच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना संघात जागा देण्याबद्दल विराट कोहलीने यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली. “आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर एखादा डावखुरा फिरकी गोलंदाज उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला चेंडू टाकत असेल; आणि एखादा उजव्या हाताने गोलंदाजी करणारा फिरकीपटू डावखुऱ्या फलंदाजाला चेंडू टाकत असेल तर त्याची दिशा, लाईन अँड लेन्थ या सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. फिरकीपटूंचा एक चेंडू कसोटी सामन्याचं चित्र पलटवू शकतो. त्यामुळे या सर्व छोट्या पण महत्वाच्या गोष्टींचा विचार करुन योग्य त्या खेळाडूंना संघात जागा मिळेल”.

श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर भारताचा संघ ३ वन-डे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर डिसेंबर महिन्याच्या अखेरीस भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होईल. २०१८ साली जानेवारी महिन्याच्या सुरुवातीस भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्या या भारताच्या तुलनेने अधिक जलद आणि वेगवान आहेत. या खेळपट्ट्यांवर अनेकदा चेंडू उसळी घेतो, ज्याचा जलदगती गोलंदाजांना फायदा होतो. त्यामुळे विराट कोहलीने दिलेल्या संकेतांवरुन दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघात कोणाची निवड होते हे पाहावं लागणार आहे.