मुंबई : आयपीएल-२०२१ (इंडियन प्रीमियर लीग) हंगाम सुरू होण्यापूर्वीच बीसीसीआयने सॉफ्ट सिग्नल हटवण्यासह शॉट रन आणि नोबॉलबद्दलही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएल-२०२१ मधून सॉफ्ट सिग्नल कमी केल्यामुळे आता ज्यावेळी मैदानावरील पंच तिसऱ्या पंचांची मदत मागतील त्यावेळी त्यांना सॉफ्ट सिग्नल द्यावा लागणार नाही. जो अंतिम निर्णय घ्यायचा आहे तो तिसरे पंचच घेतील. याबरोबर शॉर्ट रन व नोबॉलचा अंतिम निर्णयही तिसऱ्या पंचाचा राहील.

मैदानावरील पंचांना एखादा निर्णय देण्यात अडचण येते त्यावेळी ते तिसऱ्या  पंचांची मदत घेतात. आता मदत घेताना त्यांना आपला एक निर्णय द्यावा लागतो, त्यालाच ‘सॉफ्ट सिग्नल’ असे म्हणतात. हा सिग्नल खेळाडू बाद किंवा नाबादचा असतो. पुढे पडताळणीनंतर जर तिसरे पंचही आपल्या निर्णयाबद्दल १०० टक्के खात्रीशीर नसतील किंवा त्यांना खेळाडू बाद किंवा नाबाद असल्याचा ठोस पुरावा मिळत नसेल तेव्हा मैदानावरील पंचांनी दिलेल्या सॉफ्ट सिग्नलच अंतिम निर्णय असतो. अशावेळी मैदानावरील पंचांनी दिलेला निर्णय महत्त्वाचा ठरतो. १८ मार्च रोजी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या ट्वेंन्टी -२०  सामन्यादरम्यान भारताला सॉफ्ट सिग्नलमुळे फटका बसला होता. सामना भारताने जिंकला असला तरी सॉफ्ट सिग्नलमुळे वाद निर्माण झाले होते आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. आयपीएलमध्येही वाद निर्माण होऊ  नये यासाठी सॉफ्ट सिग्नल तरी वापरण्यात येणार नाही, असा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

शॉर्ट रनबाबतचा निर्णय मैदानावरील पंच घेत असतात. मात्र, आता आयपीएल-२०२१ मध्ये यात तिसऱ्या पंचांचा महत्त्वाचा वाटा असणार आहे.  तिसऱ्या पंचांना जर वाटले की मैदानावरील पंचांनी शॉर्ट रनबाबत चुकीचा निर्णय घेतला आहे, तर तिसरे पंच मैदानवरील पंचांचा निर्णय बदलू शकतात. याबरोबरच नोबॉलबाबतचा मैदानावरील पंचांचा निर्णय देखील तिसरे पंच बदलू शकतात. केवळ सॉफ्ट सिग्नल किंवा शॉर्ट रनबाबतच नाही तर सामन्याच्या कालावधीबद्दलही नियम करण्यात आले आहेत. प्रत्येक डावातील २० षटके हे ९० मिनिटात पूर्ण व्हायलाच हवीत, असा नियम करण्यात आला आहे, निर्धारित वेळेत षटक फेकले नाही तर दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.