३० मे पासून इंग्लंड येथे सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारताच्या १५ सदस्यांच्या संघाची घोषणा केली. अपेक्षेप्रमाणे विराट कोहलीकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं असून, यष्टीरक्षणासाठी निवड समितीने ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकवर भरवसा टाकला आहे. गेल्या वर्षभरात भारतीय संघाने केलेली कामगिरी पाहता, ‘विराट’सेनेला विश्वचषक विजयाचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे. मात्र भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मते भारतापेक्षा इंग्लंडचा संघ विश्वचषक विजयासाठी प्रबळ दावेदार आहे.

“गेल्या दोन वर्षांपासून इंग्लंडचा संघ सातत्याने चांगली कामगिरी करतो आहे. त्यांच्या संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीही तितकीच चांगली आहे. त्यातच यंदाची स्पर्धा ही त्यांच्या घरच्या मैदानावर होत असल्यामुळे, ते यंदाचे प्रबळ दावेदार असतील.” रवी शास्त्री प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

विजय शंकरला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्याबाबत निर्माण झालेल्या वादाबाबत शास्त्री यांनी अत्यंत मोघम उत्तर दिले. ‘‘भारतीय संघातील चौथ्या क्रमांकाबाबत आपण खूप लवचीक धोरण ठेवणार आहोत. प्रारंभीचे तीन फलंदाज निश्चित असल्याने त्यानंतरच्या क्रमांकांवर लवचीकता चालू शकेल,’’ असेही शास्त्री म्हणाले.

अवश्य वाचा – विश्वचषकासाठी आफ्रिकेचा संघ जाहीर, आमलासह अनुभवी खेळाडूंना स्थान