चेन्नईच्या एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर भारत-इंग्लंड यांच्यातील पहिले दोन कसोटी सामने प्रेक्षकांविना होणार आहेत, असे स्पष्टीकरण तमिळनाडू क्रिकेट संघटनेने शुक्रवारी दिले आहे.

करोनाच्या साथीमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार चेपॉकवरील दोन कसोटी सामन्यांना प्रेक्षकांना हजेरी लावता येणार नाही, असे तमिळनाडू क्रिकेट संघटनेचे सचिव आर. एस. रामास्वामी यांनी सांगितले.

‘बीसीसीआय’कडून २० जानेवारीला पाठवण्यात आलेल्या परिपत्रकानुसार सामने बंदिस्त स्टेडियमवर होणार असून, प्रेक्षकांना मज्जाव करण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या सामन्यांना प्रेक्षक, सन्माननीय अतिथी, उपसमिती सदस्यांना हजर राहता येणार नाही, असे या परिपत्रकात म्हटले आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील चेपॉकवरील पहिला सामना ५ फेब्रुवारीला सुरू होईल, तर दुसरा सामना १७ फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंडचा संघ २७ जानेवारीला चेन्नईच्या जैव-सुरक्षित वातावरणात दाखल होईल. केंद्र सरकारच्या ताज्या प्रमाणित कार्यप्रणालीनुसार मैदानी क्रीडा स्पर्धासाठी स्टेडियम किंवा संकुलाच्या ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. परंतु ‘बीसीसीआय’च्या निर्णयामुळे प्रेक्षकांना क्रिकेट सामने मैदानावर जाऊन पाहण्यासाठी मात्र प्रतीक्षाच करावी लागणार आहे.