महेंद्रसिंह धोनीने केदार जाधवच्या मदतीने तिसऱ्या वन-डे सामन्यात शतकी भागीदारी रचत भारताला विजय मिळवून दिला. कसोटी मालिकेपाठोपाठ भारताने 3 वन-डे सामन्यांची मालिकाही 2-1 ने जिंकली. 3 सामन्यात 3 अर्धशतकं झळकावणाऱ्या धोनीला मालिकावीराच्या किताबाने गौरवण्यात आलं. सामना संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी धोनीवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. धोनी हा क्रिकेटचा सुपरस्टार असल्याचं लँगर यांनी म्हटलं आहे.
“धोनी, कोहली, चेतेश्वर पुजारा यासारखे खेळाडू हे क्रिकेटचे रोल मॉडेल आहेत. धोनीची खेळी पाहून मी तर थक्कच झालो. वयाच्या 37 व्या वर्षीही धोनी धावा घेताना एखाद्या तरुणासारखा पळतो. गरज असेल तेव्हा गोलंदाजांना सल्ला देणं, कर्णधार विराटला सल्ला देणं आणि मधल्या फळीत फलंदाजी अशा अनेक भूमिका धोनी सध्या वठवतो आहे. माझ्यासाठी धोनी हा क्रिकेटमधल्या सर्वात महान खेळाडूंपैकी एक आहे. त्याचा खेळ पहायला मिळणं हे देखील एक भाग्यच आहे.” लँगर धोनीच्या खेळाचं कौतुक करत होता.
अवश्य वाचा – Video : हा चेंडू पकडा, नाहीतर म्हणाल निवृत्त होतोयस का?
कसोटी मालिका गमावल्यानंतर पहिला वन-डे सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने धडाक्यात सुरुवात केली होती. मात्र शेवटचे दोन सामने जिंकत भारताने मालिकेत बाजी मारली. भारताचा ऑस्ट्रेलियातला हा पहिला वन-डे मालिका विजय ठरला आहे. या मालिकेनंतर भारत न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या मालिकेत भारत 5 वन-डे आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे.