लॉर्डस क्रिकेट मैदानावर अतिशय रोमांचक अशा अंतीम सामन्यामध्ये इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय मिळवत पहिल्यांदाच विश्वविजेता होण्याचा मान पटकावला. विश्वचषक स्पर्धेमध्ये ४४ वर्षांनंतर प्रथमच इंग्लंडने जेतेपदावर नाव कोरण्याचा भीमपराक्रम अंतीम सामन्यामध्ये केला. शेवटच्या अर्ध्या तासामध्ये सामन्याला अनेक कलाटणी देणाऱ्या घडामोडी मैदानात घडल्या. यामध्ये दोन्हीकडील खेळाडूंने सामन्याचे पारडे आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेरच्या क्षणी सुपर ओव्हरमध्येही समान धावसंख्या झाल्याने सामन्यात सर्वाधिक चौकार आणि षटकार लगावणाऱ्या संघाला म्हणजेच इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आले. या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग करताना तसेच सुपर ओव्हरमध्ये धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या बेन स्टोक्सला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुकलकरच्या हस्ते स्टोक्सला हा पुरस्कार देण्यात आला. सचिन स्टोक्सला पुरस्कार देतानाचा फोटो आयसीसीने फेसबुक तसेच ट्विटवरही शेअर केला आहे. मात्र हा फोटो शेअर करताना आयसीसीने सचिनबरोबरच भारतीय चाहत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

सचिन स्टोक्सला सामनावीर पुरस्कार देतानाचा फोटो पोस्ट करताना आयसीसीने ‘सर्वकालीन सर्वात महान क्रिकेटपटू आणि सचिन तेंडुलकर’ अशी कॅप्शन दिली आहे. म्हणजेच आयसीसीने स्टोक्सला सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हटले आहे.

सामान्यपणे शतकांचे शतक तसेच इतरही अनेक विक्रम ज्याच्या नावावर आहे त्या सचिन तेंडुकलकरबद्दल बोलताना ‘सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेटपटू’ हे विशेषण वापरले जाते. मात्र मुद्दाम आयसीसीने हा फोटो शेअर करताना खोचकपणे हेच विशेषण सचिनऐवजी स्टोक्ससाठी वापरल्याचे भारतीय क्रिकेट चाहत्यांचे म्हणणे आहे. अनेकांनी या फोटोवर कमेंट करुन आक्षेप नोंदवत कॅप्शनमधील चुक सुधारून ‘बेन स्टोक्स आणि सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेटपटू’ असे करावी अशी मागणी आयसीसीकडे केली आहे. काहीजणांनी ही कॅप्शन उपहासात्मक पद्धतीने घ्यायला हवी असा सल्ला दिला असला तरी भारतीय तसेच पाकिस्तानी चाहत्यांनी या कॅप्शनवरुन आयसीसीचा चांगलाच समाचार घेतला आहे. पाहुयात काय म्हणाले आहेत भारतीय चाहते या फोटोबद्दल बोलताना…

हरभजन सिंगही भडकला…

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या ट्विटर हॅण्डलवरही हाच फोटो याच कॅप्शनसहीत पोस्ट करण्यात आला आहे. भारताचा फिरकी गोलंदाज हरभज सिंग यानेही ट्विटवर आयसीसीचा चांगलाच समाचार घेतला असून हे ट्विट रिट्वीट करुन कोट करत ‘खरचं का’ असा सवाल उपस्थित केला आहे. ‘खरचं का? खरं म्हणजे ही कॅप्शन उलटी हवी. विश्वचषक जिंकल्याबद्दल बेन स्टोक्स तुझे अभिनंदन, तुझ्यासाठी खूप आनंदी आहे’, असं हरभजनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, एकीकडे इंग्लंडने ऐतिहासिक कामगिरी केली असतानाच दुसरीकडे न्यूझीलंडचा सलग दुसऱ्या विश्वचषक स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात पराभव झाल्याने त्यांना उप-विजेते पदावर समाधान मानावे लागले आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.