पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर ११ धावांनी मात करत भारताने टी-२० मालिकेची धडाकेबाज सुरुवात केली आहे. वन-डे मालिका गमावणाऱ्या भारतीय संघाला हा विजय आवश्यक होता. टी. नटराजन आणि युजवेंद्र चहल यांच्या माऱ्यासमोर कांगारुंचा डाव कोलमडला. भारतीय संघाने या सामन्यात बाजी मारली असली तरीही या विजयाला वादाची किनार लाभली आहे.

अवश्य वाचा – Ind vs Aus : Playing XI मध्ये नसतानाही चहल गोलंदाजीला कसा आला?, जाणून घ्या नियम

फलंदाजीदरम्यान रविंद्र जाडेजाच्या हेल्मेटला बॉल लागल्यामुळे Concussion Substitute च्या नियमाअंतर्गत सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी युजवेंद्र चहलला संधी दिली. बीसीसीआयची वैद्यकीय टीम जाडेजावर उपचार करत असल्यामुळे तो दुसऱ्या डावात मैदानावर उतरला नाही. परंतू चहल मैदानावर येण्याच्या निर्णयाला ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टीन लँगर, माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू टॉम मूडी, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांनी आक्षेप घेतला.

भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी मात्र हा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. “सामनाधिकारी ऑस्ट्रेलियन आहेत. डेव्हिड बून ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळले आहेत. त्यांनी जाडेजाच्या जागेवर चहलला खेळण्याची परवानगी दिली. नियमाप्रमाणे जसाश तसा चा निकष लावायला गेला तर या गोष्टीवर चर्चा नक्कीच होऊ शकते, कारण चहल हा अष्टपैलू खेळाडू नाही. पण फलंदाजीसाठी आलेला कोणताही खेळाडू मग तो १ धाव करो किंवा १०० तो माझ्यादृष्टीने अष्टपैलूच आहे, त्यात तो गोलंदाजीही करत असेल तर तो योग्य पर्याय ठरतो. जर सामनाधिकाऱ्यांना याबाबत काही आक्षेप नसेल तर बाकीच्यांना काय प्रॉब्लेम आहे हे मला कळतच नाही.” India Today शी बोलताना गावसकर यांनी आपलं मत मांडलं.

अवश्य वाचा – Ind vs Aus : अभ्यास केला जाडेजाचा, प्रश्न आला चहलचा; पहिल्या टी-२० त भारताचा धडाकेबाज विजय