भारतीय संघ २१ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला टी२० सामना बुधवारी होणार आहे. या सामन्यासाठी BCCIने नुकताच भारतीय संघ जाहिरात केला आहे. यात अपेक्षेप्रमाणे विराट कोहली, रोहित शर्मा यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे. या दोन भारतीय खेळाडूंबाबत ऑस्ट्रेलियाचा टी२० संघाचा कर्णधार अॅरॉन फिंच सूचक वक्तव्य केले असून भारतीय कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम खेळाडू असल्याचे मान्य करून टाकले आहे.

भारतीय संघातील कोणत्याही खेळाडूला तुम्ही कमी लेखू शकत नाही. विराट हा तर सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. महत्वाचे म्हणजे टी२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये तर त्याची कामगिरी अधिकच बहरून येताना दिसते, असे तो म्हणाला.

भारतीय संघाबाबतही त्याने मत व्यक्त केले. भारतीय संघात स्फोटक आणि तडाखेबाज फलंदाज आहेत. एकदिवसीय कारकिर्दीत द्विशतक ठोकणारा फलंदाज त्यांच्या संघात आहे. भारताच्या या संघाने भरपूर टी२० क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे जर आम्ही या खेळाडूंना गृहीत धरले, तर ते आमच्या गोलंदाजांचा चांगलाच संचार घेतील याची आम्हाला कल्पना आहे. म्हणून आम्ही केवळ विराटच नव्हे तर रोहित, शिखर आणि राहुल यांना बाद करण्यासाठीही काही योजनांचा विचार करून ठेवला आहे, असे फिंचने सांगितले.