अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या रोहित शर्माही आपला क्वारंटाइन कालावधी संपवत ३० डिसेंबरला संघात दाखल झाला. रोहित मेलबर्नमध्ये दाखल झाला आणि त्याने टीम इंडियातील आपल्या सहकाऱ्यांची आणि इतर सदस्यांची गळाभेट घेतली. त्यानंतर उर्वरित दोन सामन्यांसाठी त्याला संघाचा उपकर्णधार करण्यात आलं. पण एका महत्त्वाच्या कारणामुळे रोहित शर्मासह भारताच्या पाच क्रिकेटपटूंना पुन्हा एकदा विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
दुखापतग्रस्त उमेश यादवच्या जागी ‘हा’ गोलंदाज संघात; BCCIने दिली माहिती
नक्की काय आहे प्रकरण?
मेलबर्नमध्ये एका हॉटेलात या पाच खेळाडूंनी जेवण केलं. एका चाहत्याने त्यांचे बिल भरलं. चाहत्याने खेळाडूंकडून पैसे घेण्यास नकार दिल्यानंतर या खेळाडूंनी त्याच्यासोबत सेल्फी काढला आणि त्या जोडीला धन्यवाद दिले. घडलेला प्रकार आणि व्हिडीओ त्या चाहत्याने ट्विट केला. या सर्व खेळाडूंनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्याचंही या चाहत्याने सांगितलं. मात्र बायो-बबलचे उल्लंघन केल्याचा संशय असल्याने रोहित शर्मा, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि शुबमन गिल या पाच खेळाडूंना पुन्हा एकदा विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया संघ जिथे वास्तव्यास आहे, तेथून या पाच जणांना वेगळ्या ठिकाणी विलग करण्यात आले आहे. करोना संदर्भातील नियमावली लक्षात घेता इतर भारतीय आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने या खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आलं असून या पाच खेळाडूंना सामन्यासाठी सराव करण्याची मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने शनिवारी रात्री (ऑस्ट्रेलियन स्थानिक वेळेनुसार) दिली.
JUST IN https://t.co/W25Lsq3cVX
— cricket.com.au (@cricketcomau) January 2, 2021
रोहित, पंत, शुबमनचं बिल भरणाऱ्या चाहत्याला द्यावं लागलं स्पष्टीकरण
मेलबर्नमध्ये पंतने चाहत्याला मिठी मारल्याची आधी बातमी मिळाली होती. पण नंतर त्या चाहत्याने असं काही घडलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून या घडलेल्या प्रकाराबाबत बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया तपास करत आहेत. या प्रकरणात करोना संदर्भातील कोणत्याही नियमाचं उल्लंघन झालं आहे का? याचा तपास केला जात आहे. प्राथमिक उपाय म्हणून ऑस्ट्रेलिया आणि भारतीय वैद्यकीय समितीच्या सल्ल्यानुसार या पाच खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रवासाच्या वेळी किंवा सराव करताना या पाच खेळाडूंना इतर खेळाडूंपासून वेगळे ठेवण्यात येणार आहे असेही सांगण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 2, 2021 5:08 pm