क्रिकेटप्रेमींची नजर सध्या चेन्नईतील चेपॉक स्टेडिअमवर सुरू असलेल्या भारत-इंग्लड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याकडे आहेत. पहिल्या डावाअखेर भारताने निर्णायक आघाडी घेतली आहे. मैदानावर सामना रंगलेला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशातून मैदानाचं विहंगमय दृश्य कॅमेऱ्यात कैद केलं. हा फोटो मोदींनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वासाने मैदानावर उतरलेल्या यजमान इंग्लडची दुसऱ्या कसोटी सामन्यात दैना उडाली. पहिल्या डावात भारताने दिलेल्या ३२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लडची फंलदाजी ढेपाळली. मैदानावर खेळ रंगलेला असताना पंतप्रधान मोदी यांनी मैदानावरील दृश्य कॅमेरऱ्यात टिपत, सगळ्यासोबत शेअर केलं.

पंतप्रधान मोदी रविवारी चेन्नईच्या दौऱ्यावर होते. दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी अनेक विकास कामांचा शुभारंभ केला. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी विमानातून कसोटी सामना सुरू असलेल्या चेपॉक मैदानावरील क्षण कॅमेऱ्यात टिपला. हा फोटो ट्विट करत मोदी म्हणाले,”चेन्नईत सुरू असलेल्या लक्षवेधक सामन्यातील टिपलेला एक क्षण,” अशी कॅप्शनही मोदींनी दिली आहे.

सामन्यात आज काय झालं?

अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या पाच बळींच्या जोरावर भारताने इंग्लंडला पहिल्या डावात १३४ धावांवरच रोखलं. इंग्लंडचा नवखा बेन फोक्स याने एकाकी झुंज देत नाबाद ४२ धावा केल्या. पण इतर कोणत्याही फलंदाजाला चमक दाखवता आली नाही. पहिल्या डावाअखेर भारताला १९५ धावांची आघाडी मिळाली आहे. पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या अक्षर पटेलने तुफान फॉर्मात असलेल्या कर्णधार जो रूटला (६) स्वस्तात माघारी धाडले. बेन स्टोक्स (१८) आणि ओली पोप (२२) यांनी थोड्या धावा केल्या, पण त्यांनादेखील फार काळ खेळपट्टी सांभाळता आली नाही. मोईन अली(६), ओली स्टोन (१), जॅक लीच (५) आणि स्टुअर्ट ब्रॉड (०) हेदेखील स्वस्तात बाद झाले. दुसऱ्या डावात खेळ संपला तेव्हा भारताने २४९ धावांची आघाडी घेतली आहे.