मधल्या फळीत लोकेश राहुलचं शतक आणि त्याला श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी करत दिलेल्या भक्कम साथीवर भारताने तिसऱ्या वन-डे सामन्यात २९६ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे अखेरच्या वन-डे सामन्यातही भारताची सुरुवात खराब झाली. मात्र लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यरने मधल्या फळीत भारताचा डाव सावरला.

सलामीवीर पृथ्वी शॉने या सामन्यात फटकेबाजी करत ४० धावांची खेळी केली. पृथ्वी या सामन्यात मोठी खेळी करणार असं वाटत असतानाच, दुहेरी धाव घेताना तो धावबाद झाला. मात्र पृथ्वी ज्या पद्धतीने धावबाद झाला ते पाहून भारतीय संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्राने पृथ्वी शॉला फिटनेसवर काम करण्याचा सल्ला दिलेला आहे.

भारतीय डावाची सुरुवात खराब झाली. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघात संधी मिळालेला मयांक अग्रवाल एक धाव काढून माघारी परतला. जेमिन्सनने त्याचा त्रिफळा उडवला. यानंतर कर्णधार विराट कोहलीही हमिश बेनेटच्या गोलंदाजीवर झेलबाद झाल्यामुळे भारताला दुसरा धक्का बसला. मात्र श्रेयस अय्यरने गांभीर्य ओळखत आधी पृथ्वी शॉ आणि त्यानंतर लोकेश राहुलच्या साथीने भारतीय डावाला आकार दिला. श्रेयस अय्यर ६२ धावांची खेळी केल्यानंतर माघारी परतला. श्रेयस आणि लोकेश राहुल यांच्यात शतकी भागीदारीही झाली. न्यूझीलंडकडून हमिश बेनेटने ४, तर जेमिन्सन आणि निशमने प्रत्यकेी १-१ बळी घेतला.