न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत विजयी आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाने अखेरच्या सामन्यासाठी संघात काही महत्वाचे बदल केले. पाचव्या टी-२० सामन्यात विराट कोहलीला विश्रांती देत, रोहित शर्माकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवलं. नाणेफेक जिंकून रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अखेरच्या सामन्यातही भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही, संजू सॅमसन अवघ्या दोन धावा काढत माघारी परतला.

मात्र यानंतर सलामीवीर लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान लोकेश राहुलने न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत २०० धावांचा टप्पा ओलांडत विराट कोहली आणि रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे.

लोकेश राहुलने रोहितसोबत महत्वपूर्ण भागीदारी करताना संघाचा डाव सावरला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत राहुलने ३३ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४५ धावा केल्या. दरम्यान टी-२० मालिकेनंतर भारत न्यूझीलंडविरुद्ध ३ वन-डे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs NZ : सामन्याला सुरुवात होण्याआधीच जसप्रीत बुमराहचं अर्धशतक