दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून सलामीवीर म्हणून प्रथमच खेळणाऱ्या रोहित शर्माने आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने केले. पहिल्या डावात दीडशतकी खेळी करणाऱ्या रोहितने दुसऱ्या डावातही आक्रमक खेळी करत शतक ठोकले. पहिल्यांदाच सलामीला येऊनही यशस्वी ठरण्यामागचे कारण रोहितने सामना संपल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात सांगितले.

IND vs SA : रोहितच्या तडाख्याचा दिलशानच्या विक्रमाला फटका

“कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून मला संधी दिली, त्यासाठी मी साऱ्यांचे आभार मानतो. मी प्रथमच सलामीला आलो हे जरी बरोबर असले तरी माझे लक्ष हे त्याकडे नव्हते. मी सामना जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले होते. दोन वर्षांपूर्वीपासून मी कसोटीतही सलामीला फलंदाजीसाठी यावे अशी चर्चा होती. त्यामुळे मी जेव्हा कसोटी क्रिकेट खेळत नव्हतो, तेव्हादेखील मी कसोटीसाठी वापरल्या जाणाऱ्या नव्या चेंडूने नेट्समध्ये सराव करायचो. त्याचाच मला फायदा झाला”, असे रोहितने सांगितले.

IND vs SA : रोहितचा धुमधडाका! पाकच्या माजी कर्णधाराचा २३ वर्ष जुना विक्रम मोडीत

“चेंडू पांढरा असो किंवा लाल, जेव्हा तुम्ही डावाची सुरूवात करता तेव्हा तुम्हाला अतिशय शांत आणि जबाबदारीने खेळावे लागते. जेव्हा चेंडू नवीन असतो, तेव्हा तो अधिक स्विंग होतो. तेव्हा तुम्हाला खेळ आणि खेळपट्टी दोन्हीचा अंदाज घ्यावा लागतो आणि त्या प्रकारे खेळावे लागते. मी तरी माझी खेळी अशा पद्धतीनेच खेळतो. कधी थोडीशी सावधानता आणि कधी थोडीशी आक्रमकता अशा प्रकारे खेळले तरे ते फायद्याचे ठरते. मी खेळताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवतो, ते म्हणजे मैदानावर उतरा आणि खेळाचा आनंद घ्या”, असेही रोहितने नमूद केले.

Video : बापरे! मैदानावर हे काय बोलून गेला रोहित शर्मा…

रोहित शर्माने पहिल्या डावात २४४ चेंडूत १७६ धावांची धमाकेदार खेळी केली. पहिल्या डावात त्याने २३ चौकार आणि ६ षटकार लगावले. हीच लय कायम राखत त्याने दुसऱ्या सामन्यातदेखील शतक ठोकले. रोहितने दुसऱ्या डावात १४९ चेंडूत १२७ धावांची खेळी केली. या डावात रोहितने १० चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी केली. त्यानुसार त्याने दोनही डावात मिळून ३०३ धावा केल्या. त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.