रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकर जोडीने धावांची गोडी दाखवत मोठ्या खेळीची संघाची अपेक्षा पूर्ण केली. रोहितची (१६१) दर्जेदार शतकी खेळी आणि रहाणेचे (६७) संयमी अर्धशतक या बळावर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने इंग्लंडविरुद्ध ६ बाद ३०० अशी धावसंख्या उभारली. चेपॉकच्या आव्हानात्मक खेळपट्टीचे दडपण धुगारत रोहित आणि रहाणे यांनी चौथ्या गड्यासाठी १६२ धावांची भागिदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऋषभ पंत ३३ आणि पदा्पणवीर अक्षर पटेल ५ धावांवर खेळत होते. पण पहिल्या दिवसाच्या खेळ थांबण्यापूर्वी ऋषभ पंतला इंग्लंडच्या खेळाडूंनी डिवचण्याचा प्रयत्न केला. या मालिकेत पहिल्यांदाज स्लेजिंग पाहायला मिळाली.

यष्टीरक्षक फलंदाज ऋषभला आणि इंग्लंड कर्णधार जो रुट आणि बेन स्टोक्स यांनी डिवचण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दिवसाच्या अखेरच्या षटकात पंत आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट यांच्यामध्ये बाचाबाची झाली. यामध्ये बेन स्टोक्सनेही उडी घेतली. स्टोक्स आणि पंत यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली.

ऋषभ पंतने रुट आणि बेन स्टोक्स यांचा शांततेनं सामना केला. या प्रकरणातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भारताचा माजी खेळाडू वासीम जाफर यानेही हा फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ऋषभ पंत शांतपणे उभा आहे. बॅट त्यानं आपल्या पाठीमागे पकडली आहे. यावेळी बेन स्टोक्सला पंतनं प्रत्युत्तर दिलं.

हे सर्व पाहणाऱ्या प्रेक्षकांनी पंतच्या नावानं घोषणा दिल्या आणि त्याचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. पंत आपल्या विस्फोटक फलंदाजीनं भारतीय संघाच्या धावसंख्येत किती धावा जमवतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.