News Flash

ipl 2019 : धडपडणाऱ्या राजस्थानसमोर मुंबईचे आव्हान

सहा पराभवांमुळे यजमानांची वाटचाल खंडित होण्याच्या मार्गावर

| April 20, 2019 05:00 am

अजिंक्य रहाणे

सहा पराभवांमुळे यजमानांची वाटचाल खंडित होण्याच्या मार्गावर

जयपूर : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचा संघर्ष सुरू असतानाच प्रत्येक संघाची आता बाद फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी धडपड सुरू आहे. सहा पराभवांमुळे राजस्थान रॉयल्सची वाटचाल खंडित होण्याच्या मार्गावर असली तरी त्यांना स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी शनिवारी होणाऱ्या सामन्यात बलाढय़ मुंबई इंडियन्सच्या कडव्या संघर्षांला सामोरे जावे लागणार आहे.

अवघे दोन विजय आणि सहा पराभवांमुळे राजस्थान रॉयल्सची गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्यामुळे विजयाची गाडी रुळावर आणण्यासाठी राजस्थान रॉयल्स प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. राजस्थानने गेल्या शनिवारी मुंबई इंडियन्सवर चार गडी राखून विजय मिळवला होता. आता घरच्या मैदानावर त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी राजस्थानचा संघ उत्सुक आहे.

सवाई मानसिंग स्टेडियम या घरच्या मैदानावर मात्र राजस्थानची कामगिरी सुमार झाली आहे. त्यांना घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्ध एकमेव विजय मिळवता आला आहे, तर तीन सामन्यांत त्यांनी पराभव पत्करला आहे. जोस बटलर हा एकमेव फलंदाज राजस्थानसाठी धावून येत आहे. त्याने साकारलेल्या ८९ धावांच्या आक्रमक खेळीमुळेच राजस्थानला मुंबईवर विजय मिळवता आला होता. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिले शतक झळकावण्याचा मान पटकावणारा संजू सॅमसनही गेल्या काही सामन्यांमध्ये चाचपडत आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरला आहे.

स्टीव्ह स्मिथ आणि बेन स्टोक्स हेसुद्धा चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरल्यामुळे राजस्थान अडचणीत सापडला आहे. जोफ्रा आर्चर आणि श्रेयस गोपाल यांनी वेगवान गोलंदाजीची धुरा समर्थपणे सांभाळली असून बाकीच्या गोलंदाजांकडून त्यांना चांगली साथ अपेक्षित आहे.

मुंबई इंडियन्सने सहावा विजय मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. गुरुवारी मुंबईने दिल्ली कॅपिटल्सवर ४० धावांनी विजय मिळवल्यानंतर आता ते राजस्थानकडून पत्करलेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी उत्सुक आहेत. जसप्रीत बुमरा आणि लसिथ मलिंगा हे मुंबईच्या विजयाचे शिल्पकार ठरत असून त्यांना युवा लेगस्पिनर राहुल चहर आणि कृणाल पंडय़ा यांची चांगली साथ लाभत आहे.

* सामन्याची वेळ : दुपारी ४ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि सिलेक्ट १

संघ

राजस्थान रॉयल्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, अ‍ॅश्टन टर्नर, ईश सोधी, ओशाने थॉमस, लियाम लिव्हिंगस्टोन, संजू सॅमसन, शुभम रांजणे, स्टीव्ह स्मिथ, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, सुधेशन मिधून, जयदेव उनाडकट, प्रशांत चोप्रा, महिपाल लोरमोर, आर्यमन बिरला, रियान पराग, धवल कुलकर्णी, कृष्णप्पा गौतम, वरुण आरोन, शशांक सिंग, मनन वोहरा, राहुल त्रिपाठी.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी’कॉक, सूर्यकुमार यादव, कृणाल पंडय़ा, हार्दिक पंडय़ा, किरॉन पोलार्ड, जयंत यादव, राहुल चहर, बेन कटिंग, लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमरा, युवराज सिंग, अनमोलप्रीत सिंग, आदित्य तरे, सिद्धेश लाड, इविन लुइस, पंकज जयस्वाल, अनुकूल रॉय, मयांक मरकडे, मिचेल मॅकक्लेनाघन, बरिंदर सरन, रसिख सलाम, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ.

२२ आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये २२ सामने झाले असून त्यात मुंबईने ११ वेळा तर राजस्थानने १० वेळा विजय मिळवला आहे. २००९ मध्ये उभय संघांमधील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

७ जयपूरमध्ये मुंबई आणि राजस्थान यांच्यात सात सामने झाले असून त्यापैकी राजस्थानने सर्वाधिक पाच सामने जिंकले असून मुंबईला दोनच विजय मिळवता आले आहेत.

६ राजस्थानचा संघ आतापर्यंत एकूण सहा सामन्यांत पराभूत झाला आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 5:00 am

Web Title: ipl 2019 rajasthan royals vs mumbai indians match preview
टॅग : IPL 2019
Next Stories
1 ipl 2019 : तिसऱ्या स्थानासाठी दिल्ली, पंजाबमध्ये झुंज
2 व्यावसायिक बॉक्सिंग स्पर्धा : विकास कृष्णनची दुसरी लढत शनिवारी न्यू यॉर्कमध्ये रंगणार
3 संतोष करंडक फुटबॉल स्पर्धा : गोव्यावर मात करीत पंजाब अंतिम फेरीत
Just Now!
X