आयपीएलच्या बाराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आपल्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. आयपीएलमध्ये शंभर विजय मिळवणारा धोनी पहिला कर्णधार ठरला आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानात राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात धोनीने ही कामगिरी करुन दाखवली. आपल्या संघाला 4 गडी राखून विजय मिळवून देण्यात धोनीने महत्वाचा वाटा उचलला. अंबाती रायुडू आणि धोनीच्या भागीदारीच्या जोरावर चेन्नईने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात विजय प्राप्त केला.

या यादीमध्ये गौतम गंभीर 71 विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे धोनीचं स्थान पुढची काही वर्ष अबाधित राहणार हे नक्की मानलं जातंय. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धोनीने 43 चेंडूत 58 धावा केल्या.

दरम्यान, राजस्थानच्या सर्व गोलंदाजांनी या टिच्चून मारा केला. मराठमोळ्या धवल कुलकर्णीने पहिल्याच षटकात शेन वॉटसनचा त्रिफळा उडवत राजस्थानला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर फाफ डु प्लेसिस, सुरेश रैना, केदार जाधव हे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतल्यामुळे चेन्नईचा संघ अडचणीत सापडला होता. मात्र यानंतर अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंह धोनी यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. या भागीदारीमुळे काहीकाळासाठी चेन्नईचा संघ सामन्यात वरचढ होता. रायुडूने यादरम्यान आपलं अर्धशतक पूर्ण करत, राजस्थानच्या गोटात चिंतेच वातावरणही पसरवलं.

अखेरच्या षटकांत रायुडू-धोनी माघारी परतल्यामुळे सामना दोलायमान झाला होता. त्यातच, अखेरच्या षटकात पंचांनी दिलेल्या निर्णयामुळे काहीकाळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण अखेरीस चेन्नईच्या तळातल्या फलंदाजांनी विजयासाठीचं आव्हान पूर्ण करत राजस्थानवर मात केली. राजस्थानकडून धवल कुलकर्णी, बेन स्टोक्स, जयदेव उनाडकट, जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला. चेन्नईचा एक फलंदाज धावबाद झाला.