वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेला सलामी फलंदाज मयांक अगरवाल आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव यांच्या कामगिरीवर बुधवारपासून सुरू होणाऱ्या भारत ‘अ’ विरुद्ध वेस्ट इंडिज ‘अ’ संघातील दुसऱ्या चारदिवसीय कसोटी सामन्यात क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल. या सामन्यात विजय मिळवून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेण्यासाठी भारत ‘अ’ संघ उत्सुक आहे.

श्रेयस अय्यर आणि नवदीप सैनी ट्वेन्टी-२० मालिकेसाठी अमेरिकेला रवाना झाले असून ते आता उर्वरित स्पर्धेत खेळणार नसले तरी मयांक, उमेश यांच्याव्यतिरिक्त वृद्धिमान साहा, हनुमा विहारी यांना कसोटी मालिकेपूर्वी फॉर्मात परतण्याची संधी आहे.

पहिल्या सामन्यात शाहबाज नदीमने १० बळी पटकावत अप्रतिम गोलंदाजी केली होती. मोहम्मद सिराजनेही वेगवान आक्रमणाची धुरा समर्थपणे सांभाळली. त्याशिवाय उदयोन्मुख फलंदाज शुभमन गिल आणि प्रियांक पांचाळ यांच्या कामगिरीवरही निवड समिती नजर ठेवून असेल.