करोनामुळे बंद असलेलं क्रिकेट अखेर दोन दिवसांपूर्वी सुरू झालं. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सध्या पहिला कसोटी सामना सुरू आहे. गेल्या वर्षी आजचा दिवस इंग्लंडच्या क्रिकेट संघासाठी खूप खास होता. कारण ११ जुलै २०१९ ला इंग्लंडने २७ वर्षानंतर वन डे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. बर्मिंगहॅमच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान इंग्लंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून मात केली होती. सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय यांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने सामन्यात बाजी मारली होती. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं २२४ धावांचं आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांनी सहज पूर्ण करुन दाखवलं होतं.

असा रंगला होता सामना-

यजमान इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण त्यांचा निर्णय काही प्रमाणात फसला. फिंच, वॉर्नर आणि हँड्सकॉम्ब हे तिघे अवघ्या १४ धावांत बाद झाला. पण स्टीव्ह स्मिथ आणि अलेक्स कॅरी यांनी डाव सावरला. कॅरी ४६ धावांवर बाद झाल्यावर स्मिथने डाव पुढे नेला आणि ८५ धावांची झुंजार खेळी केली. पण दुसऱ्या बाजूने त्याला फलंदाजांची साथ न मिळाल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव २२३ धावांत आटोपला. ख्रिस वोक्स आणि आदिल रशिदने ३-३ तर जोफ्रा आर्चरने २ आणि मार्क वूडने १ गडी बाद केला.

इंग्लंडला मिळालेले २२४ धावांचे आव्हान त्यांनी सहज पेलले. सलामीवीर जेसन रॉयने ८५ तर जॉनी बेअरस्टोने ३४ धावा केल्या. हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर जो रुट आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी अत्यंत संयमीपणे फलंदाजी करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

यानंतर इंग्लंडचा संघ अंतिम फेरीत न्यूझीलंडशी भिडला. सामना बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हरची मदत घ्यावी लागली. सुपर ओव्हरही बरोबरीत सुटल्यानंतर सीमारेषेपार गेलेल्या चेंडूंचा हिशेब लावत इंग्लंडला विजेतेपद बहाल करण्यात आले.