गेल्या काही दिवसांमध्ये भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर हा चांगलाच चर्चेत आहे. भारतीय संघात सलामीवीराची भूमिका बजावणाऱ्या गौतमने नुकताच राजकारणात प्रवेश केला आहे. गौतम गंभीरला भाजपकडून दिल्ली लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. याचसोबत गेल्या काही दिवसांत गौतम गंभीरने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला आपल्या टिकेचं लक्ष्य केलं होतं. बंगळुरुच्या कर्णधारपदी कायम राहिल्याबद्दल विराटने आपल्या संघाचे आभार मानायला हवेत, असं गौतम म्हणाला होता.

अवश्य वाचा – IPL 2019 : विराटच्या झंजावाताला रोखण्यासाठी चेन्नई वापरणार ठेवणीतलं अस्त्र

मात्र गौतम गंभीरच्या या टीकेला, चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंगने उत्तर दिलं आहे. “एकटा माणूस आयपीएल जिंकू शकत नाही. ही स्पर्धा खूप खडतर आहे, प्रत्येक संघ चालाखीने रणनिती आखून मैदानात उतरतो. प्रशिक्षक, व्यवस्थापक खेळाडूंची निवड करताना खूप विचार करत असतात. त्यामुळे तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाज असाल, तर तुम्ही आयपीएल जिंकला असं होत नाही. यासाठी अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात.” फ्लेमिंग टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

अवश्य वाचा – चेन्नईच्या वयस्करांपुढे आज बेंगळूरुची अग्निपरीक्षा!

आयपीएलच्या बाराव्या हंगामाच्या सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ समोरासमोर येणार आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये आयपीएलचा इतिहास पाहता, बंगळुरुच्या संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्यामुळे पहिल्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2019 : मुंबई इंडियन्सला धक्का, लसिथ मलिंगा पहिल्या 6 सामन्यांना मुकणार