‘आयआयएस’ अकादमीबाबत पार्थ जिंदाल यांना विश्वास

ऋषिकेश बामणे, विजयनगर (कर्नाटक) :

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तुम्ही कितीही अप्रतिम कामगिरी केली, तरी ऑलिम्पिक पदकाशी त्याची तुलना कधीच होऊ  शकत नाही. त्यामुळेच आमचे ध्येय हे राष्ट्रकुल पदक विजेते नव्हे, तर ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते खेळाडू घडवण्याचे आहे, अशी प्रतिक्रिया जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सच्या ‘इन्स्पायर इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्ट्स’ (आयआयएस) अकादमीचे संस्थापक पार्थ जिंदाल यांनी व्यक्त केली.

‘आयआयएस’च्या संकल्पनेविषयी जिंदाल म्हणाले, ‘‘ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे, हे कोणत्याही खेळाडूचे स्वप्न असले तरी ते तितकेच कठीणही असते. भारताची ऑलिम्पिकमधील कामगिरी कधीही फारशी समाधानकारक झाली नव्हती. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे खेळाडू हे व्यावसायिक पातळीवरील प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असतात. त्यामुळेच आम्ही कुमार वयापासूनच अशा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तराचे प्रशिक्षण मिळावे, यावर लक्ष केंद्रित केले. २०१२ मध्ये मी भारतातील कुमार व युवा खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘आयआयएस’ची संकल्पना माझ्या मित्रमंडळींसमोर मांडली. त्यांनीही मला साथ दिल्याने २०१३ मध्ये आम्ही या अकादमीची सुरुवात केली.’’

‘‘बॉक्सिंग, कुस्ती, ज्युडो, जलतरण आणि अ‍ॅथलेटिक्स या पाच खेळांचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांद्वारे ‘आयआयएस’मध्ये प्रशिक्षण दिले जाते. तब्बल ३०० खेळाडू सध्या या अकादमीत शिकत असून यामध्ये १३० कनिष्ठ खेळाडूंचाही समावेश आहे. वयाच्या आठव्या वर्षांपासून कोणीही आमच्या अकादमीत प्रशिक्षण घेण्यासाठी येऊ  शकतो व आम्ही त्याच्या गुणवत्तेवर पैलू पाडून हिऱ्यात रूपांतर करण्यावर भर देतो,’’ असे जिंदाल म्हणाले.

जपानचा कित्ता गिरवला!

‘‘भारतात कुस्ती आणि बॉक्सिंगमध्ये विशेषत: शरीराच्या वरच्या भागावरच जास्त मेहनत घेऊन लढाई केली जाते. मात्र जपानमध्ये ज्युडो हा खेळ खेळताना शरीराच्या कंबरेखालील भागही तितक्याच शिताफीने वापरला जातो. त्यामुळे जपानचे ज्युडोमध्ये मोठे नाव आहे. म्हणून आम्ही येथे कुस्ती व बॉक्सिंगमधेही ती कल्पना अमलात आणली शिवाय ज्युडो खेळाचे प्रशिक्षण देण्यातही प्रारंभ केला,’’ असे जिंदाल यांनी सांगितले.