पाक क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी संध्याकाळी टी-२० आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुन सर्फराज अहमदची हकालपट्टी केली. सर्फराजच्या नेतृत्वाखाली गेल्या काही स्पर्धांमध्ये पाकिस्तानी संघ चांगली कामगिरी करु शकला नाहीये. २०१९ इंग्लंड विश्वचषकातही पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठता आली नव्हती. नुकत्याच घरच्या मैदानावर पार पडलेल्या लंकेविरुद्ध टी-२० मालिकेतही पाकिस्तानला ०-३ ने पराभव स्विकारावा लागला. ज्यामुळे पाक क्रिकेट बोर्डाने सर्फराजच्या जागी अझर अली आणि बाबर आझम यांच्याकडे अनुक्रमे कसोटी आणि टी-२० संघाचं कर्णधारपद सोपवलं.

मात्र यानंतर अवघ्या काही तासांमध्येच पाक क्रिकेट बोर्डाला सर्फराजची माफी मागावी लागली आहे. सर्फराजच्या हकालपट्टीची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर, पाकिस्तानी खेळाडू नाचत असल्याचा एक जुना व्हिडीओ पोस्ट केला. काही क्षणांमध्येच आपली चूक लक्षात आल्यानंतर पाक क्रिकेट बोर्डाने आपलं ट्विट हटवलं. मात्र चाणाक्ष नेटकऱ्यांनी या ट्विटचे स्क्रिनशॉट सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करायला सुरुवात केली.

ज्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे.

सर्फराजची हकालपट्टी केल्यानंतर पाकिस्तानचं नेतृत्व आता नव्या खेळाडूंच्या हाती आलेलं आहे. त्यामुळे आगामी काळात पाकिस्तानचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.