पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा निर्णय

कराची : पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराझ अहमद याच्यासह अन्य खेळाडूंनी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान आपल्या पत्नींना सोबत ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) ही मागणी फेटाळून लावली आहे.

‘‘इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान आपल्यासोबत पत्नी आणि मुलांना सोबत ठेवण्याची परवानगी कर्णधार आणि संघातील काही खेळाडूंनी मागितली होती. मात्र पीसीबी या मागणीविरोधात आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान खेळाडूंसोबत पत्नी आणि मुलांना ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यांना विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याआधीच मायदेशी परतावे लागणार आहे. खेळाडूंनी फक्त विश्वचषक स्पर्धेवरच लक्ष केंद्रित करावे, अशी पीबीसीची इच्छा आहे,’’ असे पीसीबीमधील सूत्रांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. विश्वचषक आणि इंग्लंड दौरा हा प्रदीर्घ कालावधीसाठी आहे. जर कुटुंबातील व्यक्ती सोबत असतील तर खेळाडूंही निर्धास्त होतील. जर कुटुंबातील व्यक्ती सोबत असतील तर सामन्यातील ताणतणाव हलके होतील. पाकिस्तानात आपल्यातील ताणतणाव हलका करण्यासाठी मित्रमंडळी किंवा कुटुंबासोबत बाहेर जाण्याची परवानगी नसते. पण बाहेरच्या देशांमध्ये हे चालून जाते.’’

विश्वचषकादरम्यान खेळाडूंनी समाज माध्यमांवर व्यक्त होण्यावरही पाकिस्तान क्रिकेट मंडळ आणि संघ व्यवस्थापनाने र्निबध घातले आहेत.