भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर देवदत्त पडीक्कल यांची प्रशंसा केली आहे. आयपीएल २०२१च्या १६व्या सामन्यात बंगळुरूने राजस्थान रॉयल्सला सहज मात दिली. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूसमोर २० षटकात ९ बाद १७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात बंगळुरूने बिनबाद १८१ धावा करत राजस्थानला १० गड्यांनी मात दिली.

या विजयानंतर शास्त्री मास्तरांनी एक ट्विट केले आहे. ते म्हणाले, “काम करताना विद्यार्थी आणि शिक्षक. सुंदर दृश्य.” राजस्थानच्या आव्हानाचा पाठलाग करताना देवदत्तने ५२ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या. तर विराटने ४७ चेंडूत नाबाद ७२ धावा केल्या. या सामन्यात विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल या जोडीने राजस्थानच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला.

 

देवदत्तची प्रतिक्रिया

“हे शतक माझ्यासाठी खास आहे. मी फक्त याची वाट पाहू शकत होतो. जेव्हा करोनाग्रस्त होतो. तेव्हा वाटले होते, की मी पहिला सामना खेळेन. मात्र तसे झाले नाही. संघाच्या विजयात योगदान देण्यास इच्छुक होतो. आज खेळपट्टी चांगली होती. चेंडू बॅटवर येत होता. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली”, असे देवदत्तने सामना संपल्यानंतर सांगितले.

विराटचा विक्रम

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विराट कोहली आयपीएलमध्ये ६ हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने १९६ सामन्यात हा विक्रम प्रस्थापित केला. यात ५ शतके आणि ४० अर्धशतकांचा समावेश आहे. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात ५१ धावा केल्यानंतर त्याच्या नावावर हा विक्रम प्रस्थापित झाला आहे. आतापर्यंत १९६ सामन्यात ६ हजार २१ धावा केल्या आहेत.