03 March 2021

News Flash

अशी ही बरोबरी!

न्यूझीलंडने दिलेल्या ३१५ धावांच्या डोंगराएवढय़ा लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार महेंद्रसिंग धोनी बाद झाला तेव्हा भारतीय संघाला १५ षटकांमध्ये १३१ धावांची आवश्यकता होती

| January 26, 2014 05:28 am

न्यूझीलंडने दिलेल्या ३१५ धावांच्या डोंगराएवढय़ा लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार महेंद्रसिंग धोनी बाद झाला तेव्हा भारतीय संघाला १५ षटकांमध्ये १३१ धावांची आवश्यकता होती आणि चारविकेट्स शिल्लक होत्या. मात्र रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी अफलातून खेळी करत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. शेवटच्या षटकात ६ चेंडूंत १८ धावांची आवश्यकता असताना एक षटकार आणि दोन चौकारांच्या बळावर जडेजाने भारताला विजयासमीप नेले. मात्र शेवटच्या चेंडूवर दोन धावा हव्या असताना जडेजा आणि वरुण आरोन एकच धाव काढू शकले आणि भारताला बरोबरीत समाधान मानावे लागले. ही धाव रोखत न्यूझीलंडने सुटकेचा नि:श्वास सोडला आणि मालिकेतील २-० आघाडी कायम राखली. झुंजार खेळी करणाऱ्या जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्रचंड धावसंख्येचा पाठलाग करताना शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी मालिकेत पहिल्यांदाच ६४ धावांची खंबीर सलामी दिली. कोरे अँडरसनने धवनला २८ धावांवर बाद केले. रोहित शर्माने ३९ धावा केल्या. भरवशाचा विराट कोहली बेनेटच्या चेंडूवर चकल्याने भारताची ३ बाद ७४ अशी अवस्था झाली. मुंबईकर अजिंक्य रहाणेला मोठी खेळी साकारत संघातील स्थान पक्के करण्याची संधी होती मात्र अँडरसनने त्याला ३ धावांवरच बाद केले. यानंतर सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनी यांनी पाचव्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी करत डाव सावरला. रैना स्थिरावलाय, असे वाटत असतानाच टीम साऊदीचा उसळता चेंडू सीमारेषेबाहेर मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला. त्याने ३१ धावा केल्या. अश्विनने धोनीला साथ देत धावफलक हलता ठेवला.
नेहमीप्रमाणे धोनी विजयी सूत्रधाराची भूमिका निभावणार, असे चित्र होते. मात्र अर्धशतकानंतर लगेचच तो बाद झाला. धोनी बाद होताच ऑकलंडच्या मैदानातील आणि टीव्हीवर सामना पाहणारे चाहते हिरमुसले. मात्र अश्विन-जडेजा जोडीने सातव्या विकेटसाठी ९च्या धावगतीने ८५ धावा जोडल्या. या दोघांनीही न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. अश्विनने पहिलेवहिले अर्धशतक पूर्ण केले. मात्र नॅथन मॅक्क्युलमच्या गोलंदाजीवर गप्तिलने शानदार झेल टिपत अश्विनला माघारी धाडले. त्याने ४६ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकारासह ६५ धावांची खेळी केली. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीही झटपट तंबूत परतल्याने जडेजावरचे दडपण वाढले. मात्र जडेजाने तुफानी फटकेबाजी करत भारताला विजयासमीप नेले.
शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना जडेजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावला आणि केवळ एकच धाव पूर्ण झाली. जडेजाने ४५ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ६६ धावांची खेळी केली. न्यूझीलंडतर्फे कोरे अँडरसनने पाच बळी घेतले.
तत्पूर्वी, मार्टिन गप्तिलच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने ३१४ धावांची मजल मारली. गप्तिल आणि केन विल्यम्सन जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १५३ धावांची भागीदारी केली. विल्यम्सनने ६५ धावा केल्या. ल्युक रोंचीने २० चेंडूत ३८ धावा कुटल्या. गप्तिलने १२ चौकार आणि २ षटकारांसह १११ धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड : ५० षटकांत सर्वबाद ३१४ (मार्टिन गप्तिल ११२, केन विल्यम्सन ६५, रवींद्र जडेजा २/४७) पराभूत विरुद्ध भारत : ५० षटकांत ९ बाद ३१४ (रवींद्र जडेजा ६६, रवीचंद्रन अश्विन ६५, महेंद्रसिंग धोनी ५०, कोरे अँडरसन ५/६३)
सामनावीर : रवींद्र जडेजा  

    
   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2014 5:28 am

Web Title: ravindra jadeja makes opportunities count as auckland odi ends in a thrilling tie
Next Stories
1 लिएण्डर पेस, गोपीचंद यांना पद्मभूषण
2 वॉवरिन्कासमोर नदालचे आव्हान
3 ऑस्ट्रेलियन ओपन – मिश्र दुहेरीत सानिया मिर्झा पराभूत
Just Now!
X