News Flash

परदेशी खेळाडूंच्या पगारात कपात!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचा दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्याचा घाट घातला आहे.

‘आयपीएल’साठी अमिरातीत दाखल न झाल्यास कारवाई

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचा दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्याचा घाट घातला आहे. मात्र सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या उर्वरित टप्प्याला बेन स्टोक्स आणि पॅट कमिन्स यांच्यासह बहुतेक परदेशी खेळाडू मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे परदेशी खेळाडूू अमिरातीत दाखल झाले नाहीत तर त्यांच्या पगारात कपात केली जाईल, असा इशारा फ्रँचायझींनी दिला आहे.

परदेशी खेळाडू ‘आयपीएल’च्या दुसऱ्या टप्प्यात खेळू शकले नाहीत तर फ्रँचायझींचे खूप मोठे नुकसान होणार आहे. पॅट कमिन्सला कोलकाता नाइट रायडर्सने २०२०मध्ये १५.५ कोटी या विक्रमी रकमेला विकत घेतले होते. अमिरातीत रंगणाऱ्या उर्वरित ‘आयपीएल’मध्ये तो खेळू शकला नाही तर त्याला फक्त ७.७५ कोटी रुपयांचेच मानधन मिळेल.

‘‘करोनामुळे ‘आयपीएल’ अर्धवट स्थितीत थांबवण्यात आली. त्यामुळे आता अमिरातीत दुसरा टप्पा आयोजित करण्यात आला असून काही परदेशी खेळाडू येऊ शकले नाहीत तर त्यांना खेळलेल्या सामन्याइतकेच मानधन देण्याचा अधिकार फ्रँचायझींना आहे. खेळाडूंच्या पगारात कपात करण्याचा निर्णय फ्रँचायझी घेऊ शकतात,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.

या देशांचे खेळाडू मुकणार

राष्ट्रीय सेवेमुळे इंग्लंडचे खेळाडू अमिरातीतील ‘आयपीएल’च्या दुसऱ्या टप्प्यात खेळू शकणार नाहीत, असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचे (ईसीबी) व्यवस्थापकीय संचालक अ‍ॅशली जाइल्झ यांनी स्पष्ट केले आहे. इंग्लंडमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिका आयोजित केल्या जाणार आहेत. या मालिकांसाठी इंग्लंडचे सर्व खेळाडू उपलब्ध राहावेत, असे ‘ईसीबी’ने स्पष्ट केले आहे. न्यूझीलंडनेही इंग्लंडच्या पावलावर पाऊल ठेवण्याचे ठरवले आहे. व्यग्र वेळापत्रकानंतरही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना ‘आयपीएल’मध्ये खेळण्याची परवानगी द्यावी, याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलिया अद्यापही संभ्रमात आहे. बेन स्टोक्स, झाये रिचर्डसन, कायले जेमिसन, ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स आणि राशिद खान हे परदेशी खेळाडू दुसऱ्या टप्प्याला मुकण्याची शक्यता आहे.

खेळाडूंचे पगार आणि त्याचे स्वरूप

  • लिलावात सर्वाधिक बोली लागते तितका पगार (कर वगळता) खेळाडूला त्या मोसमासाठी मिळत असतो.
  • खेळाडूंच्या मिळकतीतून काही टक्के वाटा ‘बीसीसीआय’ला त्यांच्या क्रिकेट मंडळाला द्यावा लागतो.
  • एखाद्या खेळाडूला ‘आयपीएल’दरम्यान किंवा सरावावेळी दुखापत झाली तर त्याला संपूर्ण पगार द्यावा लागतो.
  • सर्व खेळाडूंना संपूर्ण मोसमात खेळल्यानंतर १२ महिन्यांच्या आत ३-४ टप्प्यात पगाराची सर्व रक्कम फ्रँचायझीकडून देण्यात येते.
  • ‘बीसीसीआय’ला ही स्पर्धा भरवण्यास अपयश आल्यास, खेळाडूंना त्यांच्या करारानुसार संपूर्ण पगार देण्यात येतो.
  • एखाद्या खेळाडूला संपूर्ण मोसमभर खेळता आले नाही तर तो संघासोबत असलेल्या सामन्यांइतकाच पगार देण्यात येतो. त्यानुसार आता अमिरातीत जे खेळाडू दाखल होणार नाहीत, त्यांचा पगार कापण्याचा अधिकार फ्रँचायझींना आहे.

भारतीय खेळाडूंना चिंता नाही : ‘बीसीसीआय’च्या खेळाडूंच्या विमा योजनेंतर्गत भारताच्या करारबद्ध खेळाडूंना ‘आयपीएल’मधील पगाराची चिंता नाही. २०११च्या मोसमानंतर बीसीसीआयचे तत्कालिन सचिव एन. श्रीनिवासन आणि भारतीय खेळाडूंशी चर्चा करण्यात आल्यानंतर सर्व खेळाडूंना विमा योजनेत स्थान देण्यात आले. त्यामुळे या योजनेनुसार, आयपीएल स्पर्धेतील सहभाग, दुखापतीमुळे अनुपलब्ध तसेच अपघात यापैकी कोणत्याही कारणासाठी खेळाडूला संपूर्ण मोसमाचे मानधन मिळण्याची तरतूद आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 2:50 am

Web Title: reduction in salaries of foreign players ssh 93
Next Stories
1 झ्वेरेव्ह, त्सित्सिपास तिसऱ्या फेरीत
2 सानियाचा विम्बल्डनमध्ये खेळण्याचा मार्ग सुकर
3 अपुऱ्या सरावाविनाही वर्चस्व गाजवू!
Just Now!
X