भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लवाद अधिकारी डी. के. जैन यांच्यासमोर सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी हितसंबंधांच्या तक्रारीसंदर्भात साक्ष दिली.

तक्रारदार संजीव गुप्ता यांचीसुद्धा स्वतंत्रपणे जैन यांनी साक्ष घेतली. तसेच जैन यांनी सचिन आणि लक्ष्मण यांना त्यांची बाजू लिखित स्वरूपात सादर करण्यास सांगितले आहे. सचिन-लक्ष्मण यांची तीन तासांहून अधिक काळ साक्ष घेण्यात आली. पुढील सुनावणी २० मे रोजी होणार आहे.

सचिन व लक्ष्मण हे ‘बीसीसीआय’च्या क्रिकेट सल्लागार समितीवर कार्यरत आहेत, परंतु नुकत्याच झालेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सचिन मुंबई इंडियन्सचा प्रेरणादायी क्रिकेटपटू होता, तर लक्ष्मणने सनरायजर्स हैदराबादसाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावली होती. त्यामुळे या दोघांवर हितसंबंधांचे आरोप करण्यात आले आहेत.