इंडियन बॅडमिंटन लीग स्पर्धेत दिमाखदार प्रदर्शनासह हैदराबाद हॉटशॉट्सला जेतेपद मिळवून देणारी सायना नेहवाल आता डेन्मार्क सुपर सीरिज स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. या वर्षी खराब फॉर्म आणि दुखापती यांनी सायनाला सतवले होते. यामुळे यंदा सायनाला एकाही स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा करता आलेला नाही. आयबीएलनंतर दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर तंदुरुस्त सायना वर्षांतले पहिलेवहिले जेतेपद पटकावण्यासाठी आतुर आहे.
‘मी या स्पर्धेची गतविजेती आहे. हे आव्हान पेलणे खडतर आहे, पण मी या आव्हानासाठी तयार आहे. आयबीएलदरम्यान माझा फॉर्म चांगला होता. सर्वोत्तम प्रयत्न देण्याचा माझा प्रयत्न असेल’, असे सायनाने सांगितले. सायनाची सलामीची लढत जागतिक क्रमवारीत ५८ व्या स्थानी असलेल्या बल्गेरियाच्या स्टेफनी स्टोइव्हाशी बुधवारी होणार आहे.
इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये हैदराबाद हॉटशॉट्ससाठी खेळताना सायनाने सातही सामन्यांत विजय मिळवला होता. आयबीएलच्या दमवणाऱ्या वेळापत्रकामुळे सायनाने काही आंतरराष्ट्रीय स्पर्धातून माघार घेतली होती. पुरेसा सराव आणि विश्रांतीसह दमदार पुनरागमनासाठी सायना उत्सुक आहे.
जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या सायनाला या वर्षी लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. ढासळता फॉर्म आणि सतत उद्भवणाऱ्या दुखापती यांमुळे बहुतांशी स्पर्धामध्ये तिला उपांत्यपूर्व किंवा उपांत्य फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आयबीएलमधील जबरदस्त फॉर्म आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवण्याची संधी डेन्मार्क स्पर्धेच्या निमित्ताने सायनाला मिळणार आहे. मात्र जेतेपदापर्यंतची वाटचाल सोपी असणार नाही. उपांत्यपूर्व फेरीत सायनाचा मुकाबला जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या दक्षिण कोरियाच्या जि ह्य़ुन स्युंगशी होणार आहे. स्युंगला नमवल्यास उपांत्य फेरीत सायनासमोर चीनच्या लि झेरूईचे आव्हान असणार आहे.
विश्व अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या पी. व्ही. सिंधूसमोर पहिल्याच फेरीत १७ व्या मानांकित जपानच्या इरिको हिरोसेचे तगडे आव्हान असणार आहे. जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या सिंधूने हा अडथळा पार केल्यास उपांत्यपूर्व फेरीत तिला थायलंडच्या रत्नाचोक इन्थॅनॉनचे आव्हान असणार आहे.
स्पर्धेच्या वेळापत्रकावर लक्ष देण्यापेक्षा फक्त खेळण्याकडे लक्ष द्या, असा सल्ला राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी भारतीय खेळाडूंना दिला आहे. ही सुपर सीरिज प्रीमिअर स्पर्धा आहे. जगभरातील अव्वल खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत, त्यामुळे प्रत्येक सामना चुरशीचा आणि खडतर असणार आहे, असे गोपीचंद यांनी पुढे सांगितले.
पुरुष गटात, जागतिक क्रमवारीत १४ व्या स्थानी असलेला पारुपल्ली कश्यप पायाच्या घोटय़ाच्या दुखापतीतून सावरत पुनरागमन करीत आहे. सलामीच्या लढतीत त्याची लढत मलेशियाच्या डॅरेन लिअुशी होणार आहे. शेवटच्या फेऱ्यांपर्यंत वाटचाल करण्यासाठी कश्यपसमोर खडतर आव्हान असणार आहे. अजय जयरामची सलामीची लढत जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या थायलंडच्या बूनसुक पोनसन्नाशी होणार आहे. आरएमव्ही गुरुसाईदत्तची लढत जागतिक क्रमवारीत अकराव्या स्थानी असलेल्या हाँगकाँगच्या ह्य़ु युनशी होणार आहे.
मंगळवारी होणाऱ्या पात्रता फेरीत के. श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, सौरभ वर्मा आणि आनंद पवार आपले नशीब अजमावणार आहेत. पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी सलामीची लढत खेळणार आहेत.
दरम्यान, आयबीएल स्पर्धेत शिस्तभंगप्रकरणी ज्वाला गट्टावर भारतीय बॅडमिंटन संघटनेने बंदीच्या शिक्षेची शिफारस केली आहे. यासंदर्भात प्रक्रिया सुरू असल्याने ज्वालाचा राष्ट्रीय संघनिवडीसाठी विचार झालेला नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने ज्वालाला सहभागी होण्याची परवानगी दिली होती, मात्र त्याआधीच संघटनेने ज्वालाच्या नावाची प्रवेशिका मागे घेतल्याने ज्वालाला या स्पर्धेत खेळता येणार नाही. ज्वालाची साथीदार अश्विनी पोनप्पा मिश्र दुहेरीत तरुण कोनाच्या साथीने सलामीची लढत खेळणार आहे.