भारतीय संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने नुकतीच भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना संघात स्थान न मिळण्यावरुन वाद सुरु झाला असतानाच लोकेश राहुलला कसोटी संघात स्थान मिळण्यावरुन आता माजी भारतीय खेळाडूंमध्ये जुंपल्याचं पहायला मिळतंय. आयपीएलच्या कामगिरीवरुन राहुलला कसोटी संघात स्थान कसं मिळतं?? BCCI यामधून चुकीचा पायंडा पाडत असल्याचं मत माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी केलं होतं. मांजरेकरांच्या या मतावर माजी क्रिकेटपटू कृष्णमचारी श्रीकांत यांनी परखड मत नोंदवत संजय मांजरेकरचं मत गांभीर्याने घेण्याची गरज नाही, त्याला मुंबईच्या पुढे विचार करता येत नाही असं वक्तव्य केलं आहे.

अवश्य वाचा – भारतीय संघात निवड होण्यासाठीचा निकष काय, सूर्यकुमारने आणखी काय करायला हवंय??

“संजय मांजरेकरला सोडून द्या, त्याला आता दुसरं काही काम नाहीये. लोकेश राहुलची कसोटी संघातील निवड कशी झाली यावर प्रश्न विचारला जातोय?? त्याने कसोटीत चांगला खेळ केला आहे. मी संजयच्या मताशी सहमत नाही. फक्त संजयला काहीतरी बोलावसं वाटलं तर त्याच्याशी सहमत होता येणार नाही. वाद तयार करण्यासाठी तुम्ही असे प्रश्न विचारू शकत नाही. लोकेश राहुलने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, त्याची आकडेवारी तपासा. संजय मांजरेकर वायफळ बडबड करत आहे. संजय मुंबईच्या बाहेर विचार करु शकत नाही ही मोठी समस्या आहे. त्याच्यासारख्या लोकांसाठी मुंबई हेच सर्वकाही आहे. ते त्याच्या पलिकडे जाऊन विचार करु शकत नाहीत. मी अशी अनेक लोकं पाहिली आहेत. हर्षा भोगलेही मुंबई सोडून काही बोलत नाही. ते न्यूट्रल राहून बोलत नाही. आपण सूर्यकुमारबद्दल बोलतोय पण मी दिनेश कार्तिक आणि आश्विनबद्दल बोलत नाहीये. आम्ही त्यांच्यासाठी भांडत नाहीयोत.” Cheeky Cheeka या यु-ट्यूब चॅनलवर बोलत असताना श्रीकांत यांनी मांजरेकरांवर टीका केली.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी असा आहे भारताचा कसोटी संघ –

विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, रविचंद्रन आश्विन, मोहम्मद सिराज

अवश्य वाचा – रोहितच्या निवडीबद्दलचा सावळागोंधळ, संघात स्थान न मिळण्यामागचं खरं कारण आलं पुढे