वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरचा मँचेस्टर कसोटी सामना जिंकून यजमान इंग्लंडने मालिका २-१ ने जिंकली आहे. तब्बल ४ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटने पुनरागमन केलं होतं. त्यामुळे या मालिकेत विजय मिळवणं हे दोन्ही संघांसाठी गरजेचं होतं. सलामीचा सामना गमावल्यानंतर बॅकफूटवर गेलेल्या इंग्लंडने अखेरच्या दोन्ही सामन्यात धडाकेबाज कामगिरी करत मालिकेत बाजी मारली. तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने अष्टपैलू कामगिरी केली.

पहिल्या डावात ब्रॉडने अखेरच्या फळीत ४५ चेंडूत ६२ धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीत ९ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. ब्रॉडने अखेरच्या फळीत केलेल्या या अष्टपैलू खेळीमुळे इंग्लंडने पहिल्या डावात ३६९ धावांपर्यंत मजल मारली. यानंतर ब्रॉडने पहिल्या डावात ६ बळी घेत विंडीजच्या डावाला खिंडार पाडलं. दुसऱ्या डावातही गोलंदाजीत आपली चमक दाखवत ब्रॉडने ४ बळी घेतले. कसोटी सामन्यात अर्धशतक आणि १० बळी घेणारा ब्रॉड हा इंग्लंडचा १९८० नंतरचा पहिलाच जलदगती गोलंदाज ठरला आहे. सर इयान बोथम यांनी मुंबई कसोटीत १९८० साली अशी कामगिरी केली होती.

वेस्ट इंडिजकडून दुसऱ्या डावात शाई होप आणि शेमराह ब्रुक्स यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना थोडाफार सामना करण्याचा प्रयत्न केला. होपने ३१ तर ब्रुक्सने २२ धावा केल्या. मात्र त्यांची डाळही फारकाळ शिजू शकली नाही. त्याआधी दिवसाच्या सुरुवातीला इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने विंडीजच्या क्रेग ब्रेथवेटला माघारी धाडत आपला कसोटी क्रिकेटमधला ५०० वा बळी घेतला. ब्रुक्स आणि होप माघारी परतल्यानंतर विंडीजच्या फलंदाजांची घसरगुंडी उडाली. ख्रिस वोक्सने भेदक मारा करत विंडीजच्या डावाला खिंडार पाडलं. त्याला ब्रॉडनेही चांगली साथ दिली. अखेरच्या फळीत ब्लॅकवुडनेही फटकेबाजी करत इंग्लंडचा विजय लांबवण्याचा प्रयत्न केला. विंडीजचा दुसरा डाव १२९ धावांवर संपवून इंग्लंडने सामन्यात बाजी मारली. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात ख्रिस वोक्सने ५ तर स्टुअर्ट ब्रॉडने ४ बळी घेतले.