भारताचा माजी विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंद याने जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याने दहा डावांमध्ये सात गुण मिळविले आहेत. या स्पर्धेत पदक मिळविण्यासाठी त्याला गुरुवारी शेवटच्या दिवशी सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. त्याने बुधवारी चार डावांमध्ये साडेतीन गुणांची कमाई केली. विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याने आठ गुणांसह आघाडीस्थान घेतले आहे. त्याने गुरुवारी पाच डावांमध्ये चार गुण मिळविले. लिवॉन आरोनियन याने साडेसात गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे. त्याने गुरुवारी पाच डावांमध्ये साडेचार गुण मिळविले. या स्पर्धेतील पाच डाव बाकी असून कार्लसनला विजेतेपदाची अधिक संधी आहे. मात्र आनंद हा जलद डावांच्या तंत्रात माहीर असल्यामुळे त्याचीही संभाव्य विजेता खेळाडू म्हणून गणना केली जात आहे. उर्वरित पाच डावांपैकी तीन डावांमध्ये त्याला पांढऱ्या मोहरांनी खेळण्याचा फायदा मिळणार आहे. त्याची पुढच्या फेरीत इयान नेपोम्निआची याच्याशी गाठ पडणार आहे.