१५ सप्टेंबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने या मालिकेद्वारे भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. विश्वचषकानंतर विंडीज दौऱ्यात हार्दिकला विश्रांती देण्यात आली. आफ्रिकेविरुद्ध मालिकेला सुरुवात होण्याआधी संघ म्हणून आपण विश्वचषकातला पराभव विसरण्याचं ठरवलं असल्याचं हार्दिकने सांगितलं. तो IANS वृत्तसंस्थेशी बोलत होता.

“विश्वचषकातला पराभव खरंच वेदनादायी होता, आम्हा सर्वांना दुःख झालं होतं, पण आयुष्य इथेच थांबत नाही पुढचा विचार करावा लागतो. जर आम्ही आमच्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकलो नसतो तर मी अधिक दुःखी झालो असतो. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यातील त्या अर्ध्या तासाचा अपवाद वगळता तर आम्ही संघ म्हणून सर्वोत्तम खेळ केला. मात्र तो पराभव आता आम्ही विसरायचं ठरवलं असून आगामी टी-२० विश्वचषकावर आमचं लक्ष केंद्रीत आहे. ही स्पर्धा जिंकण्याचं ध्येय आम्ही बाळगून आहोत.” हार्दिक विश्वचषकातला पराभव आणि आगामी स्पर्धांविषयी बोलत होता.

अवश्य वाचा – Video : ….आणि कृणाल पांड्याचं डोकं फुटता फुटता वाचलं

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी हार्दिक आणि कृणाल या दोन्ही भावांनी तयारीलाही सुरुवात केली आहे. हार्दिक आपली फलंदाजी सुधारण्याकडे भर देत असून, त्याने गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर आपल्या फलंदाजीच्या सरावाचा व्हिडीओही पोस्ट केले आहेत. त्यामुळे आगामी आफ्रिका दौऱ्यात हार्दिक पांड्या कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.