लंडन येथे २०१२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेता सुशीलकुमार व कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त यांना जागतिक कुस्ती स्पर्धेस न पाठविता विश्रांती देण्याचा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाने घेतला आहे. हा निर्णय अनेक कुस्ती चाहत्यांना अनपेक्षित वाटला आहे. कारण जवळ जवळ दोन वर्षे हे खेळाडू स्पर्धात्मक कुस्तीपासून दूर राहणार असून बऱ्याच विश्रांतीनंतर ते राष्ट्रकुलसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत उतरणार आहेत. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंना फक्त महत्त्वाच्या स्पर्धासाठीच संधी द्यायची, का यविषयीही चर्चा सुरू होती. या विषयी सुशीलकुमार याच्याबरोबरच ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय मल्ल सतपाल व कर्तारसिंग यांनी व्यक्त केलेले विचार लक्षात घेता महत्त्वाच्या खेळाडूंना दीर्घ विश्रांतीची गरज आहे असेच मत दिसून आले.

आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत हे दोन्ही मल्ल खेळणार आहेत. लंडन ऑलिम्पिकनंतर ते जरी दोन र्वष आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळले नसले तरी या दोन्ही मल्लांमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची क्षमता आहे. सुशीलकुमार हा पूर्णपणे तंदुरुस्त झाला असला तरी जागतिक स्पर्धेत त्याला पाठविणे थोडेसे धोकादायक होते. तेथे दुखापत झाली तर राष्ट्रकुल व त्यानंतर होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये त्याच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. योगेश्वर याला लंडन ऑलिम्पिकमध्येच दुखापत झाली होती. जागतिक स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या तंदुरुस्तीइतका तो शंभर टक्के तंदुरुस्त नाही. त्यालाही दीर्घकाळ विश्रांती देणे जरुरीचे होते. त्यामुळेच भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक व अन्य सहकारी प्रशिक्षकांच्या सल्ल्यानुसारच या दोन्ही मल्लांना विश्रांती देण्यात आली आहे.
महाबली सतपाल, माजी आंतरराष्ट्रीय मल्ल

लंडन येथील ऑलिम्पिकनंतर मी व योगेश्वर दत्त अद्याप कोणत्याही स्पर्धामध्ये सहभागी झालेलो नसलो तरी आमचा सराव थांबलेला नाही. आम्ही कसून सराव करत आहोत. आम्हा दोघांनाही तंदुरुस्तीच्या समस्या होत्या. मी आता पूर्णपणे तंदुरुस्त झालो आहे. अर्थात जागतिक स्पर्धेत सहभागी होण्याऐवजी विश्रांती घ्यावी, असाच सल्ला मला संघव्यवस्थापनाने दिल्यामुळे मी त्यास प्राधान्य दिले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याची मला खात्री आहे. आम्ही दोघेही पूरक सराव करीत आहोत. योगेश्वर हा जागतिक स्पर्धेत लढण्याइतका शंभर टक्के तंदुरुस्त झालेला नाही. मात्र तीन आठवडय़ांत तो लढण्यासाठी सज्ज होईल. विशेषत: रिओ ऑलिम्पिकचा विचार करता काही युवा खेळाडूंना संधी देणे आवश्यक आहे, असे माझेही मत
होते.
सुशील कुमार, ऑलिम्पिक पदकविजेता

ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणाऱ्या मल्लांना काही काळ विश्रांती देण्याची आवश्यकता असते. मात्र आंतरराष्ट्रीय स्पर्धापासून खूप काळ दूर राहणेही धोकादायक असते. कारण संबंधित खेळाडू आंतरराष्ट्रीय अनुभवापासून दूर राहिल्यास काही उदयोन्मुख खेळाडूंची शैली कशी आहे हे त्यांना कळू शकत नाही. अर्थात सुशील व योगेश्वर यांना विश्रांती देण्याचा निर्णय खूप विचारपूर्वक घेण्यात आला आहे. आगामी दोन-तीन वर्षांमध्ये अनेक महत्त्वाच्या स्पर्धामध्ये या दोन्ही मल्लांना भाग घ्यावयाचा आहे. या स्पर्धामध्येही त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा भारताला आहे. तसेच ऑलिम्पिकसाठीच्या पात्रता स्पर्धामध्येही त्यांना सहभागी व्हायचे आहे.  हे लक्षात घेता या दोन्ही मल्लांनी स्पर्धात्मक विश्रांतीबरोबरच स्थानिक स्पर्धात्मक सरावावर भर द्यायला पाहिजे.
कर्तार सिंग, माजी आंतरराष्ट्रीय मल्ल व संघटक